उमरगा (जि. उस्मानाबाद) - महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत उमरगा तालुक्यातील कसगी सीमेवर कर्नाटक पोलिसांकडून बांधण्यात येत असलेल्या तपासणी नाक्याचे काम रविवारी संतप्त ग्रामस्थांसह शिवसैनिकांनी बंद पाडले. यानंतर काही काळ तणाव निर्माण झाल्यानंतर कर्नाटक पाेलिसांना माघार घ्यावी लागली.
उमरगा तालुक्यातील कसगी हे गाव कर्नाटक सीमेवर आहे. या ठिकाणी कर्नाटक पाेलिसांकडून अधूनमधून तात्पुरत्या स्वरूपात तपासणी नाके उभारले जातात. हे तपासणी नाके नेहमी महाराष्ट्र राज्याच्या महसुली भागात उभारले जात. दरम्यान, गुलबर्ग्याचे जिल्हाधिकारी यांनी नुकतीच या भागाची पाहणी केली हाेती. यानंतर कर्नाटक सरकारने या भागात नव्याने कायमस्वरूपी तपासणी नाके उभारण्याचे निर्देश दिले होते. अशा कायमस्वरूपी तपासणी नाक्यास मात्र कसगी ग्रामस्थांनी विरोध दर्शविला होता. त्यांनी ही माहिती स्थानिक प्रशासन व आमदार ज्ञानराज चौगुले यांना दिली हाेती. त्यावरून आमदार चौगुले यांनी शनिवारी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी काैस्तुभ दिवेगावकर यांना पत्र देऊन, कसगी येथे कर्नाटक पाेलिसांकडून कायमस्वरूपी तपासणी नाका उभारण्यात येत आहे. भविष्यात हा प्रश्न संवेदनशील हाेऊ शकताे. त्यामुळे खबरदारी घेण्याची गरज व्यक्त केली हाेती. दरम्यान, कसगी ग्रामस्थांचा विरोध असतानाही रविवारी सकाळीच कर्नाटक पोलीस प्रशासनाने सीमेवर तपासणी नाका उभारण्यासाठी वाळू, वीट, सिमेंट आणून टाकले. यानंतर तपासणी नाक्याच्या बांधकामास ते सुरुवात करणार होते. ही माहिती मिळताच शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबूराव शहापुरे, कसगी ग्रामस्थ व उमरगा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल मालुसरे यांनी सीमेवर जाऊन बांधकामास विरोध दर्शविला. त्यामुळे काहीकाळ मोठा गोंधळ निर्माण झाला. एवढेच नाही तर कसगी ग्रामस्थ, शिवसेना तालुकाप्रमुख शहापुरे व कर्नाटक पाेलिसांत शाब्दिक चकमक झाली. तणाव वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर कर्नाटक पोलिसांनी माघार घेत काम थांबविले. माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार संजय पवार यांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली. सीमेवर आता उमरगा ठाण्याचे पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत.
.