उमरगा - मागील वर्षी ऐन मार्चच्या शेवटच्या टप्प्यात कोरोना विषाणूचा संसर्ग राेखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले. यामुळे व्यवसाय, व्यापार तसेच संपूर्ण जनजीवन ठप्प झाले. परिणामी नगर परिषदेच्या करवसुलीवरदेखील माेठा परिणाम झाला आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षातील कर वसुली ६० टक्क्यांवरच लटकली आहे. मार्चअखेर करवसुलीत प्रगती न झाल्यास याचा परिणाम विकास कामांवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मालमत्ता कर, पाणीपट्टी कर, दैनंदिन व आठवडी बाजार चिठ्ठी वसुली, दुकान गाळे भाडे यातून येणारे उत्पन्न नगर परिषद फंडात जमा केले जाते. या फंडामधून दैनंदिन किरकोळ कामे, कंत्राटी कामगारांचे वेतन, साहित्य खरेदी, स्टेशनरी, बांधकाम याशिवाय परिस्थितीनिहाय निघणारी तातडीची कामे केली जातात. याशिवाय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देय असलेली देयकेदेखील याच फंडातून दिली जातात. वास्तविक दरवर्षी पालिका ९० टक्क्यांच्या जवळपास करांची वसुली करते. विशेषतः आर्थिक वर्ष संपण्याच्या मार्च महिन्यात ही वसुली मोहीम युध्दपातळीवर राबविली जाते. मात्र, कर वसुलीचे अवघे दोन महिने राहिले आहेत. जानेवारीअखेर ४० टक्के करवसुली बाकी आहे. गेल्या वर्षभरात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आल्याने याचा परिणाम पालिकेच्या कर वसुलीवर झाला आहे.
चाैकट...
उमरगा नगर परिषद हद्दीत ८ हजार २५० मालमत्ताधारक आहेत. २०२०-२१ या आर्थिक वर्षात या मालमत्ताधारकांकडे ४७ लाख ८६ हजार रुपये व मागील बाकी ३ लाख ७२ हजार असे ५१ लाख ५८ हजार रुपये मालमत्ताकराची बाकी होती. त्यापैकी ३५ लाख ३ हजार रुपये म्हणजेच, जवळपास ६७.९१ टक्के वसुली झालेली आहे.
सर्वात जास्त उत्पन पालिकेला मिळते ती पाणीपट्टी कर वसुली फक्त ५६.३३ टक्के होऊ शकली आहे. उमरगा शहरात ४ हजार २९५ नळ कनेक्शन धारक असून यांच्याकडून पाणीपट्टी करातून २०२०-२१ या आर्थिक वर्षात ८० लाख ४६ हजार व मागील बाकी ४२ लाख ८० हजार असे एकूण १ कोटी २३ लाख २६ हजार रुपये येणे होते. परंतु, लॉकडाऊनमुळे फक्त ६९ लाख ४४ हजार रुपये पाणीपट्टी कर वसुली होऊ शकली. तब्बल ५३.८२ लाख रुपये येणे बाकी आहे.यावर्षी आतापर्यंत मालमत्ताधारकांकडून अवघी ६७.९१ टक्के तर पाणीपट्टीधारकांकडून ५६.९४ टक्के वसुली झालेली आहे.
दैनंदिन व आठवडी बाजार चिठ्ठीद्वारे उमरगा पालिकेला दरवर्षी उत्पन मिळते. ही कर वसुली करण्यासाठी लिलावप्रक्रिया करून ठेकेदाराला कर वसुलीसाठी परवानगी दिली जाते. त्याच्या बदल्यात त्याच्याकडून एक विशिष्ट रक्कम घेतली जाते. यावर्षीही महिना ८३ हजार रुपये याप्रमाणे ९ लाख ९६ हजार रुपये अदा करण्याचा करार झालेला असून,त्याची निविदाप्रक्रियाही झालेली आहे. परंतु, संबंधित पात्र कंत्राटदाराने वसुलीचे कंत्राट घेण्यास नकार दिल्याने पालिकेला फटका बसला.
लॉकडाऊनमुळे मधल्या काळात करवसुलीवर निश्चितच परिणाम झाला आहे. तरी आम्हाला ९० टक्क्यांच्या जवळपास करवसुली अपेक्षित आहे. सध्या उस्मानाबाद जिल्ह्यात करवसुलीमध्ये उमरगा पालिका प्रथम स्थानावर आहे. तसेच हद्दवाढ भागातील व शहरातील नवीन मालमताधारकांच्या,व्यवसायिकांच्या नोंदी करणार आहेत. त्यासाठी तीन पथके तयार करण्यात आली आहेत. जास्तीत जास्त करवसुली करण्यावर आमचा भर असणार आहे.
- रामकृष्ण जाधवर, मुख्याधिकारी