कळंब : लग्नकार्य म्हटले की आशा, अपेक्षा, मानपान आलाच. त्यास विविध परंपराचा छटाही असतेच. मात्र, कोरोना काळात या सोहळ्याचा नूरच बदलला असून अपेक्षांचा ‘बाजार’ जवळपास उठला असल्याने ‘बँड ना बारात, थेट घरात’ असे नवरूप घेत जागोजागी ‘झट मंगनी, पट ब्याह’ असे सोहळे आकारास येत आहेत.
वयाचा आलेख विवाहयोग्य टप्प्यावर आला की, वधू-वरांचा सुरू झालेला शोध हव्या तशा ‘सुयोग्य’ वधू-वरांचे ‘स्थळ’ निश्चित करून थांबतो. यानंतर चालीरीतींच्या पावलावर मानपानाचा आब राखत मोठ्या धूमधडाक्यात साखरपुडा, तिथीनिश्चय, विवाहकार्य ते सत्यनारायण पूजा असे विविध कार्य पार पाडले जातात. यात सर्वांत महत्त्वाचा भाग असतो तो स्थळ निश्चितीचा; पण कोरोना काळात परिस्थितीने अनेक प्रचलित पद्धतीला फाटा देण्यास प्रवृत्त केले असतानाच विविध घटकांत वधूंची वानवा असल्याने वरपक्षांकडून ‘जसं असेल तसं’ या तत्त्वावर रेशीम गाठी जुळवून घेण्यावर भर दिला जात आहे. यात सजलेला ‘अपेक्षांचा बाजार’ गुंडाळला गेला असून दोन्ही पक्ष एकमेकांना समजून घेऊन ‘कर्तव्य’ पार पाडत आहेत.
या अपेक्षा झाल्या कमी...
लग्न अमक्या शहरातच, चांगल्या मंगल कार्यलयातच अन् धूमधडाक्यात सोहळा करा? असले आग्रह राहिले नाही.
खानपान, मानपान याला दुय्यम महत्त्व राहिले असून ‘जसं जमेल तसं’ भागवून घेत बडेजाव बंद होत आहेत.
जिथे मुलींची संख्या कमी आहे त्या समाजात वरदक्षिणा बंद झाली असून ‘श्रीफळावर’ समाधान मानत आहेत.
या अपेक्षांची पडली भर...
कोरोनाकाळात फार्मसी, पॅरामेडिकल क्षेत्रांतील वधू-वरासह डॉक्टरांसाठी आग्रह वाढला.
घरात राहून ‘वर्क फ्रॉम होम’ पद्धतीने जॉब करणारेही चालतील असे बायोडाटावर नमूद केले जात आहे.
मोठ्या शहरात नको; पण माणसांच्या वर्दळीत रहिवास असावा. वाहतुकीशी कनेक्ट असलेल्या गावांतील स्थळ असावे, अशा अपेक्षा वाढल्या आहेत.
वधू-वर सूचक मंडळ काय म्हणतात?
कोरोनाच्या काळात विवाहकार्याचे स्वरूप बदलले आहे. अनेक खर्चिक बाबींना फाटा देण्यात येत आहे. यातच केवळ नोकरीच हवी, याऐवजी आता ‘व्यवसाय’ करणारा वर चालेल, अशी धारणा याकाळात वाढली आहे.