उस्मानाबाद : राज्य सरकारने ७ मे २०२१ रोजी मागासवर्गीय पदोन्नतीचे आरक्षण रद्द करण्याबाबत निर्णय घेतला आहे. २६ जून रोजी आरक्षणदिनाचे औचित्य साधून राज्य सरकारने मागासवर्गीय पदोन्नतीयांच्या पदोन्नतीमधील आरक्षणाचे आदेश २६ जून २०२१ रोजी निर्गमित करण्यात यावेत, अशा मागणीचे निवेदन कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्याना देण्यात आले.
या दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, छत्रपती शाहू महाराजांनी २६ जून १९०२ साली कोल्हापूर संस्थानातील मागासवर्गीय जनतेला ५० टक्के आरक्षणाची घोषणा केली. तसेच त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याबाबत आदेश जारी केले होते. देशातील एकूण ५५० संस्थांनापैकी मागासर्गीयांना ५० टक्के आरक्षण देणारे कोल्हापूर हे एकमेव संस्थान होते. त्यामुळे २६ जून हा त्यांचा जन्मदिवस आरक्षण दिन साजरा केला जात आहे. राज्य शासनाने या दिनाचे औचित्य साधून ७ मे २०२१ रोजी मागासवर्गीय पदोन्नतीचे आरक्षण रद्द करण्याबाबत घेण्यात आलेला निर्णय रद्द करण्यात यावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. या निवेदनावर कास्टाईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष मिलिंद जानराव, उपाध्यक्ष प्रवीण बनसोडे, सरचिटणीस गौतम रणदिवे, दयानंद जेटीथोर, सुहास गंगावणे, के.जी. कांबळे, एम.ए. थोरात, एस.डी. चव्हाण आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.