कळंब : राज्य सरकारने बलुतेदारांना अत्यावश्यक सेवेत सामावून घ्यावे, अन्यथा त्यांना कुटुंब भागविण्यासाठी पाच हजार रुपये मदत करावी, अशी मागणी येथील नागरिकांनी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोविड संसर्ग टाळण्यासाठी शासनाने राज्यात पंधरा दिवसांचा लॉकडाऊन लागू केला आहे. यामुळे आर्थिक दुर्बल घटकातील, बारा बलुतेदार, हातावर पोट असलेल्या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. पारंपरिक व्यवसाय करून उदरनिर्वाह चालविणाऱ्या लोकांचे कोरोनामुळे संपूर्ण व्यवसाय उद्ध्वस्त झाले आहेत. गेल्या वर्षभरापासून हातावर पोट असणाऱ्या बलुतेदारांचे सर्वच व्यवसाय बंद आहेत. यामुळे हजारो कुटुंबांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. घरात बसून तरी काय करावे, हा प्रश्न यांच्यापुढे आहे.
अशा अडचणीच्या काळात शहरातील आर्थिकदृष्ट्या खचलेल्या या घटकाला दिलासा देण्यासाठी लॉकडाऊन काळात राज्य सरकारने बारा बलुतेदारांना अत्यावश्यक सेवेत सामावून घ्यावे किंवा प्रत्येकी पाच हजारांची मदत करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.
यावर नगरसेवक सतीश टोणगे, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य हर्षद अंबुरे, चेतन कात्रे, अकीब पटेल, रमेश काळे, दत्तात्रय पांचाळ, वाजेद तांबोळी, किरण राजपूत, कृष्णा वाघमारे यांच्या सह्या आहेत.