उस्मानाबाद : कोरोना संसर्गापासून बचाव व्हावा, अनेक नागरिक कोविड प्रतिबंधात्मक लस घेत आहेत. लस घेतल्यानंतर अनेकांना ताप येत होता. त्यामुळे लसीबद्दल अनेकांच्या मनात अकारण भीती निर्माण झाली होती. मात्र, लस घेतल्यानंतर ताप आल्यास घाबरण्याची गरज नसून लस शरीरावर काम करीत असल्याचे संकेत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यात आली. त्यामुळे लसीकरणासाठी नागरिक पुढे येऊ लागले आहेत. लस घेतल्यानंतर सर्वाच ताप, अंगदुखी असा त्रास जाणवत नाही. त्यामुळे ताप न आल्यास लस खरी की खोटी असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडत आहे. मात्र, प्रत्येक व्यक्तीच्या शरीर वेगळे असल्याने सर्वांनाच ताप येईल, असे नाही. ताप येऊ अथवा न येऊ नागरिकांनी लस घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले.
आतापर्यंतचे लसीकरण
पहिला डोस
४९६६२६
दुसरा डोस
१९१०३१
कोव्हॅक्सिन
१३४०५४
कोविशिल्ड
५५३६०३
दोन्ही लसींचा सौम्य त्रास
कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन प्रकारच्या लस कोरोना प्रतिबंधासाठी वापरण्यात येत आहेत. लस घेतल्यानंतर काहींना ताप, अंगदुखी असा त्रास होताे. दोन्ही लस सारख्याच असल्याने परिणामकारक आहेत. ताप, अंगदुखीचा सर्वांना त्रास होत नाही. त्रास झाला तरी सौम्य स्वरुपाचा असतो.
लसीनंतर काहीच झाले नाही
कोरोना संसर्गापासून संरक्षण व्हावे, यासाठी मी कोविशिल्डची लस घेतली आहे. लस घेतल्यानंतर काहीच त्रास झाला नाही. कुटूंबातील अन्य सदस्यांनी मे महिन्यात लस घेतली होती. त्यांना ताप आला होता.
श्रावण ओव्हाळ,
पूर्वी लस घेतल्यानंतर काही जणांना ताप, अंगदुखी असा त्रास होत असल्याचे सांगितले जायचे, त्यामुळे लस घेण्यासाठी अनेकजण टाळत हाेते. मी दोन दिवसापूर्वी कोव्हॅक्सिन लस घेतली आहे. लस घेतल्यानंतर काही त्रास झाला नाही.
आसेफ शेख,