तुळजापूर (जि. धाराशिव) : चैत्र महिना सुरू झाला आहे. त्यामुळे उन्हाची तीव्रताही प्रचंड वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर आता श्री तुळजाभवानी देवीला कापडी पंख्याच्या सहाय्याने वारा घालण्यास मंगळवारपासून सुरूवात झाली. शेकडाे वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा आजही कायम आहे.
चैत्र महिना सुरू झाल्यापासून उन्हाची तीव्रता माेठ्या प्रमाणात वाढली आहे. अशा या वातावरणात श्री तुळजाभवानी देवीला थंडावा मिळावा, यासाठी गुढी पाडवा ते मृग नक्षत्र या कालावधीत देवीला कापडी पंख्याच्या सहाय्याने दरराेज दुपारी एक ते सायंकाळी चार या वेळेत वारा घातला जाताे. शेकडाे वर्षांपासून चालत आलेल्या या परंपरेला मंगळवारी सुरूवात करण्यात आली. याप्रसंगी भाविकांनी दर्शनासाठी माेठी गर्दी केल्याचे दिसून आले.
कैरीचे पन्हे अन् सरबतउन्हाळ्याचे दिवस असल्याने श्री तुळजाभवानी देवीला प्रतिदिन दुपारी चार वाजण्याच्या सुमारास कैरीचे पन्हे, सरबत तसेच नैसर्गिक पद्धतीने तयार केलेले शितपेय चांदी, तांब्याच्या फुलपात्रात देवीला दाखविण्यात येते. यानंतर ते उपस्थित भाविकांना प्रसाद म्हणून वाटप करण्यात येते.