कळंब : गत अनेक महिन्यांपासून बंद असलेली सौरपंप योजनेच्या नोंदणीची ऑनलाईन ‘लिंक’ मंगळवारी खुली झाली खरी परंतु, अवघ्या एक तासातच ती पुन्हा ‘कोमात’ गेली. यामुळे केवळ ‘झलक’ दाखवून गायब झालेल्या या लिंकमुळे असंख्य इच्छुक शेतकऱ्यांना नाहक मनःस्ताप सहन करावा लागला.
सुरळीत वीजपुरवठ्याअभावी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान ऊर्जा व उत्थान महाअभियान अर्थात पीएम किसान ही योजना राबविण्यास सुरुवात केली. यानुसार शेतकऱ्यांना तीन, पाच व साडेसात अश्वशक्ती क्षमतेचे सौरपंप उपलब्ध करून देण्यात येऊ लागले. यासाठी शेतकऱ्यांना नाममात्र पाच ते दहा टक्के आपला हिस्सा द्यावा लागत असे. यापूर्वी महावितरण कंपनीच्या माध्यमातून ही योजना राबवली जात होती. मात्र, मागच्या दीड वर्षात यासाठी केली जाणारी नोंदणी ठप्प असल्याने अनेक इच्छुक शेतकरी या योजनेपासून दूर राहिले होते. वारंवार यासाठी ऑनलाइन नोंदणी सुरू आहे का? हे पडताळण्यासाठी सेवा केंद्राकडे हेलपाटे मारत होते. विशेषतः खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना तर मोठी प्रतीक्षा करावी लागली होती. अखेर महाराष्ट्र राज्य ऊर्जा अभिकरणाच्या माध्यमातून राज्यात ‘महाकृषी ऊर्जा अभियान’ असे गोंडस नाव धारण करत मंगळवारी कृषी पंपांना सौरशक्ती पुरवण्यासाठी नोंदणी करता यावी याकरिता लिंक उपलब्ध करून दिली. यामुळे मागच्या वर्षभरापासून प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनी मोठी धावपळ करून कागदपत्राची धावपळ केली. मात्र, लिंक पुढं न चालल्याने शेतकऱ्यांची धावपळ व्यर्थ ठरली.
चौकट...
रात्री उशिरापर्यंत शेतकऱ्यांचे प्रयत्न
महावितरणच्या पोर्टल तसेच महाराष्ट्र राज्य ऊर्जा अभिकरण अर्थात महाउर्जाने सौरपंप नोंदणीसाठी ‘कुसुम’ ची लिंक उपलब्ध करून दिली. याची शेतकऱ्यांना माहिती होताच अवघ्या एक तासाभरात ही सेवा ‘जाम’ झाली. यानंतर पुढे नाव अन् गट क्रमांकाच्या पुढे कोणतीच प्रक्रिया होत नव्हती. यानंतर तर काहीच प्रोसेस होत नव्हती. एकूणच अवघ्या एक तासाभरात प्रणाली बंद झाल्यात जमा होती. यामुळे झलक दाखवून गायब झालेल्या त्या लिंकला कनेक्ट होण्यासाठी, त्याठिकाणी आपले नाव नोंदणीसाठी शेतकरी रात्री उशिरापर्यंत आटापिटा करत होते.