उमरगा : दरवर्षीप्रमाणे यंदाही लाडक्या बाप्पाचे मोठ्या उत्साहात आगमन झाले असून, शुक्रवारी नागरिकांनी विघ्नहर्त्या गणरायाच्या मूर्ती तसेच सजावट साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी केली होती. भक्तांनी मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने घरी विधिवत मूर्तीची प्रतिष्ठापना करून पूजन केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यावर नियम व अटी घालून दिल्याने गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. शहरातील बहुतांश गणेश मंडळांनी गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. काही मंडळांनी मात्र लहान मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. परंतु, भक्तांचा उत्साह कमी झालेला नव्हता.
घरोघरीही गणरायाच्या आगमनाची जोरदार तयारी करण्यात आली होती. आकर्षक सजावटीसह विद्युत रोषणाईत घरोघरी गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना करून पूजा करण्यात आली. जुन्या जिल्हा परिषद शाळेतील मोकळ्या मैदानात गणेशमूर्ती व सजावट साहित्याची दुकाने थाटण्यात आली होती. शुक्रवारी सकाळपासूनच लहान-थोरांसह नागरिकांनी येथे मोठी गर्दी केली होती. बच्चे कंपनीचा उत्साह वेगळाच होता. चिमुकल्यांनी आपल्या पालकांसह गणेशमूर्ती खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली होती. काही गणेश मंडळांचे पदाधिकारी व सदस्यही गणेशमूर्ती खरेदी करून, गणपती बाप्पाचा जयघोष करीत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा कोरोनाच्या संकटामुळे उत्सव नेहमीप्रमाणे साजरा करू शकणार नसले तरी, गणरायाच्या आगमनाचा उत्साह सर्व चिंता विसरायला लावणारा दिसत होता. कोरोना प्रतिबंधाची पुरेपूर काळजी घेत यंदाचा गणेशोत्सव गर्दी न करता, घरच्या घरीच साजरा करण्यावर सर्वांचा भर असल्याचे दिसून येत होते.