राेसा येथील गणिता गव्हाणे (अर्जदार) यांच्या वडिलांनी काही रक्कम व्याजाने घेतली व त्या बदल्यात संबंधितास दोन गुंठे खरेदीखत करून दिले होते; परंतु सावकाराने पैसे परत घेऊनही जमीन परत न केल्याने गैरअर्जदार सावकार अशोक नरसिंह लंगोटे (रा. उपळाई ठो., ता. बार्शी) व जाकीर पटेल (रा.स्वामी समर्थ नगर, परंडा) यांच्याविरुद्ध तक्रार दिली हाेती. त्यानुसार परंडा व बार्शी तालुक्यातील गैरअर्जदारांच्या विरोधात अशोक नरसिंह लंगोटे यांच्या बार्शीतील सराफ दुकानात, उपळाई (ठो. ता. बार्शी) येथील घरी व परंडा येथील सराफा दुकानात झाडाझडती घेण्यात आली. परंड्यातील दुकानातील चाव्या नसल्यामुळे तपासाअभावी दुकान सीलबंद करण्यात आले. परंडा शहरातील जाकीर पटेल यांच्या घरी व स्टॅम्प पेपर दुकानाची झाडाझडती घेतली. अर्जदार संदिपान जगन्नाथ बारस्कर व ब्रम्हदेव बारस्कर या दोघांनी पुणे येथील सरस्वती मारुती राऊत यांच्या विरोधात सावकारीची तक्रार केली होती. त्या अनुषंगाने पुणे शहरातील राऊत यांच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. ही कारवाई लातूर व पुणे या दोन विभागाने पुणे, सोलापूर व उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांच्या समन्वयाने केली आहे. उस्मानाबाद जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेचे सुनील शिरापूरकर, सोलापूर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेचे कुंदन भोळे व पुणे शहर उपनिबंधक नारायण आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई परंडा सहायक निबंधक सहकारी संस्थेचे संजय जाधव यांनी केली. कारवाईत नोंदवह्या, कोरे चेक, सात-बारा, खरेदीखत, कोरे बॉण्ड, फेरबाबत बॉण्ड, रजिस्टर, खरेदी करारनामे आदी दस्तावेज अवैध जप्त करण्यात आले. पथकात १४ अधिकारी, कर्मचारी इतर कर्मचारी, पंच व पोलीस कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत ही कार्यवाही सुरू होती.
अवैध सावकारांच्या कार्यालयासह घरांची झाडाझडती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:38 IST