लोहारा : तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यालयाने डिजिटल पोस्टरच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी राष्ट्रीय शाळेचा इतिहास मांडला असून, या डिजिटलचे उद्घाटन परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे व स्वातंत्र्य सैनिक अजित नायगावकर यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले.
अध्यक्षस्थानी वामनराव जाधव हे होते. यावेळी शिवाजीराव देशमुख, गजानन गवळी, अजित नायगावकर, सुरेखा जगदाळे, श्याम घोगरे, विराट पाटील, सचिन तावडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे, नागन्ना वकील, उमरगा लोहारा विधानसभा अध्यक्ष विजय लोमटे, युवक तालुकाध्यक्ष नाना पाटील, हाजी बाबा शेख, मिलिंद नागवंशी, शह आयुब शेख, माजी नगरसेवक गगन माळवदकर, सातप्पा होनाळकर, दत्ता पवार, राजेंद्र कदम, बाबूराव पवार आदी उपस्थित होते.
याप्रसंगी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्यावतीने मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या पूर्वसंध्येला हिप्परगा येथील राष्ट्रीय शाळेला शंभर वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल स्वातंत्र्यलढ्यामध्ये भाग घेतलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचा व त्यांच्या पत्नीचा सत्कार करण्यात आला. तसेच स्वामी रामानंद तीर्थ विद्यालयाचे मुख्याध्यापक भोईटे यांनी राष्ट्रीय शाळेचा पूर्ण इतिहास लोकांसमोर आपल्या व्याख्यानातून मांडला. या दुर्लक्षित शाळेचा ऐतिहासिक ठेवा शासनाने जतन करून या ठिकाणी स्वातंत्र्य सैनिकांची व राष्ट्रीय शाळेची आठवण म्हणून एक भव्य स्मारक उभारावे. त्यामध्ये ग्रंथालय, संग्रहालय व्हावे, अशी अपेक्षा विजय लोमटे यांनी यावेळी व्यक्त केली.