येरमाळा - कळंब तालुक्यातील रत्नापूर शिवारात शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जाेरदार पाऊस झाला. या पावसात विद्युत खांब आडवे झाले. झाडे उन्मळून पडली. तसेच आंब्याच्या बागांचेही माेठे नुकसान झाले आहे.
येरमाळासह परिसरात शुक्रवारी (दि. १४) सायंकाळपासून आकाशात ढगांची गर्दी जमली हाेती. साधारणपणे सात वाजण्याच्या सुमारास जाेराचा वारा सुरू झाला; तर आठ वाजता वादळी वाऱ्यासह वळवाच्या पावसाला सुरुवात झाली. या वादळी वाऱ्यामुळे रत्नापूर शिवारातील आंब्यांच्या झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. शेतकऱ्यांनी शेतात काढून ठेवलेला कांदाही पावसात भिजला आहे, असे शेतकरी राजेंद्र टेकाळे यांनी सांगितले. याच शिवारात तीन विद्युत खांबही आडवे झाले आहेत. शेतकरी राजेंद्र वैजिनाथ टेकाळे यांच्या शेतातील साैरपंपाच्या बाेर्डाचेही माेठे नुकसान झाले आहे. साेबतच अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील कडब्याच्या गंज्या उडून गेल्या आहेत. दरम्यान, सदरील नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.