कळंब : बालक, मातांच्या सुदृढ आरोग्यासाठी आगामी ३० सप्टेंबरपर्यंत ‘पोषण माह’ उपक्रम राबविला जाणार असून, या अंतर्गत ‘आजीबाईंचा बटवा, कुपोषण हटवा’ अशा विविध घोषणांसह ‘कुपोषणाकडून सुपोषणाकडे’चा नारा देत, तालुक्यातील सर्व अंगणवाडीत बालकांची ‘रॅली’ काढण्यात आली.
शून्य ते सहा वयोगटांतील बालके, गरोदर व स्तनदा माता व किशोरवयीन मुलींच्या सुदृढ आरोग्यासाठी एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाकडून विविध उपक्रम राबविले जातात. गावोगावच्या अंगणवाडीमधून याकडे लक्ष केंद्रित केले जाते. यासाठी तपासणी, नोंदी, सल्ला, समुपदेशन व पोषक आहारावर भर दिला जातो. असे असतानाही कुपोषणाचा विषय वारंवार समोर येत आहे. यामुळेच याकडे गांभीर्याने लक्ष देत, सप्टेंबर महिना ‘राष्ट्रीय पोषण महिना’ म्हणून साजरा करत, विविध कार्यक्रमांवर फोकस केले जाते. यासाठी कळंबच्या प्रकल्प अधिकारी वैशाली सांगळे यांनीही बिटस्तरीय नियोजन करत, बुधवारी या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. अंगणवाडीसेविका, मदतनीस व बालकांनी अंगणवाडी क्षेत्रात प्रभातफेरी काढत जनजागृतीचा प्रयत्न केला. आगामी ३० सप्टेंबरपर्यंत तालुकाभर विविध उपक्रम राबविले जाणार असल्याचे प्रकल्प अधिकारी वैशाली सांगळे यांनी सांगितले.
चौकट...
बिट स्तरावर नियोजन...
पोषण महिना उपक्रमांतर्गत बिटस्तरावर नियोजन केले आहे. यात मोमीन, दहिफळ व नायगावमध्ये आगलावे, येरमाळ्यात बोरफळकर, शिराढोण व लोहटामध्ये बोराडे, इटकूरमध्ये सावंत व मंगरुळ बिटमध्ये झांबरे या पर्यवेक्षीकांनी पोषण माहचे उद्घाटन करत, यशस्वितेसाठी आवश्यक त्या सूचना दिल्या.
© असे आहे स्वरूप...
१ सप्टेंबर - पोषण माह उद्घाटन
२ ते ७ सप्टेंबर - ‘पोषण वाटीका - वृक्षारोपण’
८ ते १५ सप्टेंबर - पौष्टिकतेसाठी योग आणि आयुष कार्यक्रम
१६ ते २३ सप्टेंबर - पोषण किट/पोषण समृद्धीकरण
२४ ते २९ - सॅम मुलांची निश्चिती, पौष्टिक आहाराचे वितरण
३० सप्टेंबर - पोषण माह समारोप
१ ते ३० सप्टेंबर - विशेष गृहभेटी