लोहारा : येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोपान अकेले यांची अन्यत्र बदली करावी, या मागणीसाठी ग्रामसेवक संघटनेने पंचायत समितीसमोर सोमवारी धरणे आंदोलन केले.
यापूर्वीही येथील गटविकास अधिकारी सोपान अकेले यांची बदली करण्याची मागणी तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक संघटनेकडून करण्यात आली होती. यावरून २६ जूनला चौकशी समिती नेमण्यात आली. चौकशीअंती गटविकास अधिकारी अकेले हे १ जुलै ते ३१ जुलै या महिनाभरासाठी रजेवर गेले. त्यानंतर ते २ ऑगस्ट रोजी परत रुजू झाले आणि पुन्हा कोणतेही कारण पुढे करत ग्रामसेवकांना त्रास देत असल्याचा आरोप करीत त्याची बदली करा, या मागणीसाठी ग्रामसेवक संघटनेने १० ऑगस्टपासून असहकार आंदोलन सुरु केले आहे. त्यानंतर १७ ऑगस्ट रोजी ग्रामसेवकांनी आपापल्या ग्रामपंचायत कार्यालयात काळ्या फिती लावून दिवसभर कामकाज केले. यानंतरही त्यांची बदली न झाल्याने संघटनेने सोमवारी लोहारा पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या आंदोलनात ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष एम. टी. जगताप, जिल्हा कार्याध्यक्ष संजय कारभारी, सय्यद तालुका सचिव डी. पी. पवार, जी. डी. कोकाटे, एन. एफ. दबडे, एम. के. बनशेट्टी, ए. बी. भोरे, एच. डी. कारभारी, एस. एस. भुसे, ए. सी. मोरे, जी. टी. इंगळे, एम. व्ही. कदम, एस. एन. मातोळे, आर. एन. वाघमारे, एस. एम. मुंडे आदी ग्रामसेवक सहभागी झाले होते.