उस्मानाबाद : जिल्ह्यातील ३६ पोलीस अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश सोमवारी रात्री निघाले आहेत. अनेक ठिकाणी खांदेपालट झाली असून, नियंत्रण कक्षात स्वतंत्र जबाबदारीची वाट पाहत बसलेल्या ६ अधिकार्यांचीही लॉटरी निघाली आहे. दरम्यान, तुळजापूरचे निरीक्षक अजिनाथ काशिद यांना तुळजापूर येथेच नियमित करण्यात आले तर भूमचे निरीक्षक रामेश्वर खनाळ यांची रवानगी साईड ब्रँचला केली गेली आहे.
जिल्हास्तरीय पोलीस आस्थापना मंडळाने घेतलेल्या निर्णयानंतर सोमवारी रात्री पोलीस अधिकार्यांच्या बदल्यांचे आदेश निघाले. यामध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. कळंब येथील वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांना उस्मानाबादला आणले गेले आहे. त्यांना येथील आनंदनगर ठाण्यात पदस्थापना देण्यात आली आहे. तर त्यांच्या ठिकाणी आनंदनगर ठाण्याचे निरीक्षक यशवंत जाधव यांना पाठविण्यात आले आहे. भूम येथे कार्यरत रामेश्वर खनाळ यांची साईड ब्रँच समजल्या जाणार्या जिल्हा विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या ठिकाणी उस्मानाबाद ग्रामीणचे डी.एन. सुरवसे यांना पाठविण्यात आले आहे. ग्रामीणला आता बाहेरुन येत असलेले सुरेश साबळे कारभार पाहणार आहेत. दरम्यान, नियंत्रण कक्षातून वाशी अन् तेथून तुळजापूरचा तात्पुरता पदभार दिलेल्या अजिनाथ काशिद यांनी कामाची चुणूक दाखविल्याने त्यांना तुळजापुरात नियमित करण्यात आले आहे. दोन खून प्रकरणांचा लावलेला छडा, रोचकरी प्रकरणात केलेल्या कार्यवाहीची बहुधा बक्षिसी असावी. पोलीस निरीक्षक यशवंत बागुल यांना तुळजापूर मंदिर सुरक्षेसाठी नियमित करण्यात आले आहे. तर निरीक्षक खाजामैनोद्दीन पटेल यांच्याकडे पूर्वीचा अनैतिक मानवी वाहतूक कक्षाचा पदभार अतिरिक्त ठेऊन सायबर शाखेत बदली देण्यात आली आहे. याशिवाय, १६ सहायक निरीक्षकांच्याही बदल्या झाल्या आहेत. यामध्ये लोहारा येथे एस.पी. काकडे, मुरुम येथे ए.एन. माळी यांच्याकडे ठाण्याचा प्रभार सोपविण्यात आला आहे. तर १२ उपनिरीक्षकांनाही बदलीने पदस्थापना देण्यात आली आहे.
नियंत्रण कक्षाचा पोळा फुटला...
बदलीच्या प्रतिक्षेत नियंत्रण कक्षात अडकून पडलेल्या ५ सहायक निरीक्षक तर एका उपनिरीक्षकाला या बदल्यांमध्ये बाहेर पदस्थापना मिळाली आहे. यात सहायक निरीक्षक के.बी. दराडे यांना कळंब, महिला सहायक निरीक्षक के.बी. मुसळे यांना तुळजापूर, एस.बी. कासार यांना सायबर, एन. एकशिंगे यांना परंडा, पी.आर. तायवाडे यांना नळदुर्ग तर उपनिरीक्षक पी.व्ही. फंड यांना वाशी ठाण्यात पदस्थापना देण्यात आली आहे.