उस्मानाबाद तालुक्यातील जवळा दु. शिवारात मागील काही आठवड्यांपासून मध्यरात्री शेळ्यांचा बाजार भरविला जात आहे. ज्या ठिकाणी हा बाजार भरतो, ती शेतजमीन महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या आहे. सोमवारी मध्यरात्री सुरू होणारा हा बाजार मंगळवारच्या पहाटेपर्यंत सुरू असतो. या बाजारात मोठ्या संख्येने विक्रेते व खरेदीदार उपस्थित राहत आहेत. बाजार भरणारी शेतजमीन ही मलिक यांच्या पत्नी मेहजबीन नवाब मलिक, कन्या सना नवाब मलिक, मुलगा फराज नवाब मलिक व बुश्रा संदुश फराज, समीन नवाब मलिक, निलोफर समीर खान यांच्या नावे आहे. आळणी शिवारातील गट क्र. ३३९ व जवळे दु. येथील २८३/२, २८३/४, २८३/५ असे त्यांचे गट क्रमांक आहेत. सद्य:स्थितीत महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन सुरू आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात तर रुग्णालये व औषधी दुकाने वगळता सर्व बाजारपेठ बंद आहे. असे असतानाही मध्यरात्रीचा बाजार हा मंत्री महोदयांच्या पाठिंब्यावर सुरू आहे का, असा प्रश्न जिल्हा भाजपने केला आहे. मंत्र्यांच्या कुटुंबीयांकडूनच कोरोनाच्या काळात सर्व नियम पायदळी तुडवत शेळी-बोकडांचा बाजार भरविणे व प्रशासनाने कोणतीही कार्यवाही न करणे, हे चुकीचे असल्याचे सांगत या कुटुंबावर तातडीने कारवाई करावी व मलिक यांचा सरकारने राजीनामा घ्यावा, अशी मागणी भाजपच्या वतीने जिल्हाध्यक्ष नितीन काळे, सरचिटणीस ॲड. नितीन भोसले, युवा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, प्रवीण पाठक यांनी गुरुवारी केली.
मंत्री नवाब मलिकांच्या कुटुंबीयांच्या जागेत शेळीबाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:34 IST