उस्मानाबाद : कोविडच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी उत्सव साजरा करण्यासाठी गर्दी होऊ नये व तो घरातच भक्तीमय वातावरणात पार पाडता यावा, यासाठी कसबे तडवळे येथील जयभवानी प्रतिष्ठानने पुढाकार घेतला आहे. तडवळ्यासह चार गावांतील भाविकांसाठी यंदा १ रुपयात गणेशमूर्ती उपलब्ध करुन देत यंदाचा सोहळा कोविडमुक्त साजरा करण्यासाठी प्रेरित करण्यात येत असल्याचे प्रतिष्ठानचे संस्थापक गणेश जमाले यांनी मंगळवारी सांगितले.
कसबे तडवळे येथील जय भवानी प्रतिष्ठानच्या वतीने सातत्याने सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात. जवळपास आता दोन वर्षांपासून कोरोनामुळे सर्वच सण-उत्सव नागरिकांना साधेपणाने साजरे करावे लागत आहेत. आताही तिसर्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याअनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना उत्सवाच्या निमित्ताने होणारी गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील यांच्या सूचनेप्रमाणे गणेश जमाले यांनी कोविडमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. कसबे तडवळेसह परिसरातील गोपाळवाडी, कोंबडवाडी, दूधगाव येथील नागरिकांना भक्ती तुमची मूर्ती आमची या उपक्रमांतर्गत १ रुपयात गणेशमूर्ती उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यासाठी दीड हजार मूर्ती खरेदी करण्यात आल्या असून, त्या आता उपरोक्त गावांत पोहोच करण्यात येत असल्याचे जमाले म्हणाले. १० सप्टेंबर रोजी कसबे तडवळे येथील शिवाजी चौकात या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात येत आहे. उपरोक्त चारही गावात सकाळी ७ ते ११ या वेळेत नागरिकांना मूर्ती देण्यात येणार असून, त्याचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजक गणेश जमाले यांनी केले आहे. दरम्यान, सिनेअीिनेत्री अलका कुबल, वनमाला बागुल यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले असून, गणरायांच्या भक्तांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.