उमरगा : नागपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत उमरगा तालुक्यातील जवळगा बेट येथील रहिवासी प्रा. डॉ. श्रीकांत गायकवाड यांची जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या कार्यकारिणीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या कार्यकारिणीचा कालावधी तीन वर्षांसाठी राहणार आहे.
डॉ. गायकवाड यांचा विविध सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक चळवळीत, मराठवाडा जनता विकास परिषद, वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक संघटना, उपेक्षितांच्या चळवळीमध्ये सक्रिय सहभाग आहे. नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे ते विद्यमान सदस्य आहेत. लातूर येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे समाजशास्त्र विभाग प्रमुख आहेत. त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय, प्रादेशिक परिषदा, चर्चासत्रे, कार्यशाळामध्ये ‘साधन व्यक्ती’ या नात्याने बीज भाषणे दिली आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी एम.फिल., पीएच.डी.चे संशोधन पूर्ण केले आहे. या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.