उस्मानाबाद : रोजच्या आहारात खाद्यतेलाचा वापर केला जात असतो. त्याच तेलाचा पुनर्वापर हा आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. हॉटेल, हातगाड्यांवर मात्र खाद्यतेलाचा वारंवार वापर केला जात असतो. अशा तेलाचे पदार्थ नियमित खाण्यात आल्याने नागरिकांना हृदयाचे आजार, मेंदूविकार, अपचन असे आजार उद्भवत आहेत. त्यामुळे बाहेरील खाणे टाळावे, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे. आहारात समाविष्ट असलेल्या भाज्यांमध्ये खाद्यतेल वापरले असते. त्यातून शरीराला कॅलरीज व पोषक घटक मिळत असतात. त्यामुळे तेल आवश्यकही मानले जाते. मात्र, त्याचा अतरिक वापरही शरीरास हानीकारक ठरू शकतो. त्यात पुनर्वापर केलेले खाद्यतेल सर्वांत घातक ठरू शकते. अशा तेलाचा वापर हॉटेल, हातगाड्यांवरील खाद्यपदार्थ बनविण्यासाठी केला जात असतो. पुनर्वापर झालेल्या तेलापासून पुरेसे उष्मांक भेटत नाहीत. कार्बन घटक वाढतात. त्यामुळे फुफ्फुसाचे आजार वाढण्याची शक्यता असते. हृदयाचे आजार, मेंदूविकार, अपचन असे आजार उद्भवत आहेत. तेलाचा पुनर्वापर करणे हा गुन्हा मानला जातो. मात्र, जिल्ह्यात अशा प्रकारे तेलाचा पुनर्वापर करणाऱ्या एकाही विक्रेत्यावर गुन्हा नोंद झालेला नाही.
तेलाचा पुनर्वापर आरोग्याला घातक
खाद्यपदार्थ तळताना खाद्यतेलाचा वापर एक किंवा दोनदा होणे अपेक्षित आहे. पुनर्वापर वापर केल्यास तेलापासून फुफ्फुसाचे आजार उद्भवू शकतात. अपचनाचा त्रास, किडनीसंबंधीचे आजार, चरबी वाढणे, उच्चरक्तदाब, आतड्यांचे आजाराचा धोका आहे.
रस्त्यावर न खाल्लेलेच बरे
चिभेचे चोचले पूर्ण करण्यासाठी नागरिक रस्त्यावर उघड्यावर विक्रीस असलेले समोसे, वडापाव, भजी असे पदार्थावर ताव मारत असतात. अशा पदार्थ बनविण्यासाठी वारंवार त्याच तेलाचा वापर केलेला असतो. तसेच काही हॉटेलमध्येही दिवसभर त्याच तेलाचा पुनर्वापर करून पदार्थ बनविलेले जातात. त्यामुळे रस्त्यावरील न खाल्लेलेच उत्तम.
डॉक्टरांचा सल्ला
तेलाचा पुनर्वापर झाल्यास त्यात शरीराला कॅलरीज कमी प्रमाणात मिळतात. कार्बन घटक वाढतात. त्यात तळलेले पदार्थ खाण्यात आल्यास अपचनाचा त्रास, फुफ्फुसाचे आजार जडतात. त्यामुळे बाहेरील उघड्यावरील खाणे टाळावे.
डॉ. राज गलांडे, फिजिशियन
खाद्यतेलाचा पुनर्वापराने सॅच्युरेटेड फॅट वाढतो. तेलाची क्वालिटी राहत नसल्याने पोषक घटक मिळत नाहीत. त्यामुळे चरबी वाढते, ह्रदय, किडनीचे आजार, उच्चरक्तदाब, आतड्यांचे आजारही उद्भवतात. त्यामुळे पुनर्वापर टाळणे गरजचे आहे.
डॉ. तानाजी लाकाळ, फिजिशियन
तर होईल गुन्हा दाखल
तेलामध्ये २५ टक्क्यापेक्षा जास्त पोलार कम्पांउंड आरोग्यासाठी घातक असतात. दोन ते तीन वेळेपेक्षा तेलाचा वापर करता येत नाही. त्यामुळे खाद्यपदार्थ विक्रेत्यांना तेलाचा पुनर्वापर न करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. पुनर्वापर केल्यास कारवाई केली जाते. तसेच १ लाखांर्यंत दंडही होऊ शकतो.
शि. बा. कोडगिरे, सहायक आयुक्त, अन्न, अन्न व औषध प्रशासन,
अहो आश्चर्यम, एकावरही कारवाई नाही
शहरातील हॉटेल, स्वीटमार्ट, उपाहारगृह, हागाड्यांवर तळलेले खाद्यपदार्थ बनवित असतात. खाद्यपदार्थ बनविण्यासाठी वापरण्यात येणारे पदार्थांची भेसळ होऊ नये, तसेच तेलाचा पुनर्वापर केला जाऊ नये, यासाठी अन्न व औषध प्रशासनान विभागाचे नियंत्रण असते. मात्र, या चालू वर्षात तेलाचा पुनर्वापर केल्याप्रकरणी एकाही कारवाई झालेली नाही.