उस्मानाबाद : सलग दुसऱ्या वर्षीही कोरोनामुळे गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा होत असून, १० सप्टेंबर रोजी गणरायाचे आगमन झाल्यापासून शहरातील गणेश मंडळ जनजागृतीचे कार्यक्रम राबवित आहेत. रविवारी अनंत चतुर्थी दिवशी भक्त्भावाने गणेशमूर्तींचे विसर्जन होईल. शहरातील गणेश विसर्जनासाठी नगर परिषदेच्या वतीने जय्यत तयारी केली आहे. पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी ४ फिरते रथ तैनात असणार आहेत. शहरातील गणेश मंडळानी साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला. कोरोनामुळे यंदा गणेशोत्सवावर निर्बंध आहेत. त्यात तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे गणेश विसर्जनाच्या वेळी गर्दी टाळण्याकरिता नगर परिषदेकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. हातलादेवी तलाव, विसर्जन विहीर या ठिकाणी श्रींच्या विसर्जनाची सोय करण्यात आली आहे. या ठिकाणी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी चार फिरते रथ शहरातून मूर्ती संकलित करणार आहेत. या रथात हौदाची व्यवस्था केली असून, तेथेच श्रींचे विसर्जन करण्यात येणार आहे. नागरिकांनी विसर्जनासाठी गर्दी करू नये, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
कोट...
पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करण्यासाठी शहरात चार फिरते रथ फिरणार आहेत. या रथावर प्रत्येकी ४ स्वयंसेवक नेमण्यात आले आहेत. हातलाई तलाव, विसर्जन विहीर या ठिकाणी विसर्जनाची सोय करण्यात आली आहे. नगर परिषदेचे ५६ कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. नागरिकांनी विसर्जनाच्या दिवशी गर्दी करू नये, घरासमोर रथ आल्यानंतर स्वयंसेवकांना श्रींची मूर्ती सुपूर्द करावी.
हरिकल्याण येलगट्टे, मुख्याधिकारी, उस्मानाबाद
या भागात फिरणार रथ
सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत शहरातील विविध भागातून गणेश विसर्जन रथ फिरणार आहेत. १ रथ एस. टी. स्टँड, परशुराम कॉलनी, समर्थनगर, बँक कॉलनी, पोस्ट कॉलनी, पोलीस लाईन, राजीव गांधी, महात्मा गांधी नगर, ज्ञानेश्वर मंदिर ते न.प.हद्द परिसर या भागात फिरेल.
२ रा रथ डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, तांबरी विभाग, समतानगर, एस.आर.टी. कॉलनी, शिक्षक कॉलनी, बार्शी नाका, आदर्शनगर, हनुमान चौक, उंबरे कोठा ते न.प. हद्द या भागात राहणार आहे.
३ रा रथ इंदिरा नगर, पाथ्रुडवाडा, बायपास परिसर, गणेश नगर, आडत लाईन, जुना बसडेपो, तुळजापूर नाका ते नगर परिषद हद्द परिसर भागात फिरणार आहे.
४ था रथ पोस्ट ऑफिस, सावरकर चौक, काळामारुती चौक, मारवाडगल्ली, गुजर गल्ली, गवळी गल्ली, मेन रोड,............. ांजावेस, भीमनगर, नेहरू चौक, जुनी गल्ली, इंगळे गल्ली, जाेशी गल्ली, बाजार चौक, वैराग नाका परिसर ते नगर परिषद हद्द परिसरात असणार आहे.