उस्मानाबाद : जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या उस्मानाबाद तालुक्यातील जागजी ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना प्रणित पॅनेलने १३ पैकी आठ जागांवर विजय मिळविला असून, सत्ताधारी पॅनेलला अवघ्या पाच जागांवर समाधान मानावे लागले.
खा. ओम राजेनिंबाळकर व आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रतिष्ठेची लढाई म्हणून या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे पाहिले जात होते. येथे खा. राजेनिंबाळकर यांचे मामा नानासाहेब ऊर्फ बालाजी पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना प्रणित महालक्ष्मी-ज्योतिर्लिंग ग्रामविकास पॅनेल आणि जि. प. सभापती दत्ता देवळकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलमध्ये लढत झाली. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत हा रणसंग्राम रंगतदार झाला. शेवटी तेरापैकी आठ जागांवर विजय मिळवित बालाजी पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने हा गड ताब्यात घेतला. मागीलवेळी निवडणूक न होता ही ग्रामपंचायत देवळकरच्या ताब्यात आली होती.