उस्मानाबाद तालुक्यातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणून तेरणा मध्यम प्रकल्पाची ओळख आहे. या प्रकल्पाची क्षमता २०.५५४ दलघमी इतकी आहे. उस्मानाबाद शहराला या प्रकल्पातूनच पाणीपुरवठा होतो. सोबतच तेर, ढोकी, तडवळे, येडशी या मोठ्या गावांनाही तेरणातूनच पाणीपुरवठा होतो. काही कारणास्तव गेल्या काही महिन्यांपासून या चार गावांचा पाणीपुरवठा बंद असला तरी तो भविष्यात सुरु होणर आहेच. याशिवाय, गोवर्धनवाडी, मुळेवाडी, थोडसरवाडी, कावळेवाडी ही लहान गावेही तेरणावरच विसंबून आहेत. कृषी सिंचनासाठी या प्रकल्पाचा मोठा वापर होतोया प्रकल्पामुळे परिसरातील हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली आली असून, गेल्या वर्षी तेरणा प्रकल्प शंभर टक्के भरल्याने मोठ्या प्रमाणावर या भागातील शेतकऱ्यांनी ऊस लागवड केली आहे. यावर्षी पावसाळा संपत आला तरी धरणात पाणीसाठा वाढला नव्हता. रविवारपर्यंत प्रकल्पात ४१ टक्के इतकाच जलसाठा उपलब्ध होता. दरम्यान, मागील दोन दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळे प्रकल्पात पाण्याची आवक वेगाने सुरु झाली. यामुळे सोमवारी ११ टक्के पाण्याची भर प्रकल्पात पडली. मंगळवारीही फ्लो सुरुच राहिल्याने सायंकाळपर्यंत ६.५८ टक्के वाढले. त्यामुळे गेल्या दोनच दिवसांत १७ टक्के पाणी वाढून आता प्रकल्पात ५७.५८ टक्के इतका जलसाठा झाला आहे. बुधवारपर्यंत यात आणखी चांगली भर पडणार आहे.
तेरणात फ्लो कायम, उस्मानाबादला दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:39 IST