काक्रंबा : तुळजापूर तालुक्यातील काक्रंबासह परिसरातील काक्रंबा (वाडी), खंडाळा, वडगाव (ला), कार्ला, व्होनाळा, जवळगा, सलगरा (दि), किल्ले, वाणेगाव, बारूळ आदी गावांतील सोयाबीन पीक बहरात आले असून, सध्या शेतकरी अंतर्गत मशागत दंग असल्याचे दिसत आहे.
यावर्षी रोहिणी व मृग नक्षत्रांच्या सुरुवातीला बऱ्यापैकी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन, उडीद, मूग, मका, कपाशी, तूर आदी पिकांचा पेरा केला आहे. सुरुवातीला पेरणीयोग्य पाऊस झाल्याने मोठ्या आनंदाने शेतकऱ्यांनी पेरणी उरकून घेतली. मात्र, मध्यंतरी १५ ते २० दिवस पावसाने हुलकावणी दिल्याने कोवळी पिके माना टाकू लागली होती. दरम्यान, गेल्या चार दिवसांपूर्वी झालेल्या रिमझिम पावसाने पिकांना जीवदान मिळाले आहे. त्यामुळे सध्या या भागातील शेतकरी पिकांमधील अंतर्गत खुरपणी, निंदणी व कोळपणी आदी कामांमध्ये व्यस्त असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर सततच्या ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन पिकावर किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसत असून, शेतकरी महागडी कीटकनाशके फवारणी करून पिकांना अळीपासून वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, पावसाचा दीड महिना उलटला तरी अद्याप या भागात दमदार पाऊस पडलेला नाही. त्यामुळे नदी, नाले, ओढे कोरडीच आहेत. त्यामुळे शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
कोट......
सोयाबीनच्या पिकावर केसाळ अळी, उंट अळी, पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आढळून आला असेल तर ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. जास्त प्रादुर्भाव असल्यास क्विनॉलफॉस २५ ईसी १५ मिली किंवा प्रोफेनाॅफाॅस ५० टक्के २० मिली अथवा ट्रायझोफॉस ४० टक्के १२.५ मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
- श्लोक अंधारे, कृषी सहायक, काक्रंबा
180721\img-20210718-wa0133.jpg
काक्रंबा परिसरात सोयाबीन पिकांमधील अंतर्गत मशागत व्यस्त शेतकरी