कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी सण, उत्सव साधेपणाने साजरे करण्याचे राज्य शासनाचे आदेश आहेत. यामुळे लोहारा पोलीस ठाण्याकडून शहरासह तालुक्यातील प्रत्येक गावात गणेश मंडळाच्या, ग्रामस्थांच्या बैठका घेऊन याविषयी जनजागृती करण्यात आली. यामुळे लोहारा शहरासह तालुक्यात सार्वजनिक गणेश मंडळांनी शासनाच्या नियमांचे पालन करीत गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. तसेच गणेश मूर्तीचे विसर्जनही जागेवर करण्यात आले. गल्लोगल्ली लहान मुलांनी गणेश मूर्तीची स्थापना केली होती. त्यांनीही हलगीच्या तालावर नाचत गणरायाला निरोप दिला. लोहारा शहरात घरगुती गणपती विसर्जन संदर्भात नगरपंचायतीकडून नियोजन करण्यात आले होते. विसर्जनादिवशी रविवारी शहरातील प्रत्येक प्रभागात ट्रॅक्टर फिरविण्यात आले. या ट्रॅक्टरमधील कर्मचाऱ्याकडे नागरिकांनी आपापल्या घरातील गणेशाची मूर्ती जमा केल्या. काही परिसरातील घरात, तलाव, विहिरीत गणेश मूर्तीचे विसर्जन केले. ग्रामीण भागातील भक्तांनीही गावाजवळील तलाव, विहिरीत गणेश मूर्तीचे विसर्जन केले.
गणरायाला भक्तिभावाने निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:36 IST