उस्मानाबाद : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात आपल्या लाडक्या बाप्पांना शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांनी निरोप दिला. गतवर्षीप्रमाणे यंदाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिरवणुकीस फाटा देत साधेपणाने विसर्जन करण्यात आले.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे यंदा प्रशासनाच्या वतीने अनेक गणेश मंडळांना सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनास प्रतिसाद देत शहरात १६ मंडळांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला. तर हजारो गणेशभक्तांनी आपल्या घरी गणेशमूर्तीची स्थापना केली. १० सप्टेंबरपासून शहरातील गणेश मंडळाच्या वतीने जनजागृतीचे कार्यक्रम राबविल्यात आले. काही गणेश मंडळांनी अन्नदान, आरोग्य शिबिर घेतले. कोरोना संसर्गाची खबरदारी घेत मंडळांनी सजावट, थाटमाट, ढोल, लेझीम, झांज, मिरवणुका, जल्लोषास बगल देत कोरोना जनजागृतीवर भर दिला. विसर्जनाच्या दिवशी गर्दी टाळण्याकरिता पालिकेच्या चार फिरते रथ शहरात मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी फिरत होते. या ठिकाणी १ हजार २०० मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. शिवाय, शहरातील विसर्जन विहीर व हातलादेवी तलावात गणेशमूर्ती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. पालिकेने शहरातील तब्बल साडेनऊ हजारांवर गणेशमूर्तीचे विसर्जन केले. सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत शहरात विसर्जन सुरु होते.
१२०० गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन
पर्यावरणपूरक गणेशविसर्जन करण्यासाठी शहरात चार फिरते रथ फिरत होते. या रथावर प्रत्येकी ४ स्वयंसेवक नेमले होते. हातलाई तलाव, विसर्जन विहिरीवर विसर्जनाची सोय केली होती. नगर परिषदेचे ५६ कर्मचारी यासाठी तैनात होते. नागरिकांनी घरासमोर रथ आल्यानंतर गर्दी न करता स्वयंसेवकांना श्रींची मूर्ती सुपूर्द करुन विसर्जन केले. शहरातील सुमारे १ हजार २०० गणेशमूर्तींचे विसर्जन रथातील हौदात करण्यात आले.
या भागात फिरत होते रथ
सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत शहरातील विविध भागांतून गणेश विसर्जन रथ फिरत होते. १ ला रथ एस. टी. स्टँड, परशुराम कॉलनी, समर्थनगर, बँक कॉलनी, पोस्ट कॉलनी, पोलीस लाईन, राजीव गांधी, महात्मा गांधी नगर, ज्ञानेश्वर मंदिर भागात मूर्ती विसर्जनासाठी फिरत होता.
२ रा रथ डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, तांबरी विभाग, समतानगर, एस.आर.टी. कॉलनी, शिक्षक कॉलनी, बार्शी नाका, आदर्शनगर, हनुमान चौक, उंबरे कोठा भागात विसर्जनासाठी होता.
३ रा रथ इंदिरा नगर, पाथ्रुडवाडा, बायपास परिसर, गणेश नगर, आडत लाईन, जुना बसडेपो, तुळजापूर नाका भागात फिरला.
४ था रथ पोस्ट ऑफिस, सावरकर चौक, काळामारुती चौक, मारवाडगल्ली, गुजर गल्ली, गवळी गल्ली, मेन रोड, सांजावेस, भीमनगर, नेहरू चौक, जुनी गल्ली, इंगळे गल्ली, जाेशी गल्ली, बाजार चौक, वैराग नाका परिसरात मूर्ती विसर्जनास होता.
हातलादेवी तलावात साडेपाच हजार मूर्तींचे विसर्जन
शहरातील विसर्जन विहीर, हातलादेवी तलाव परिसरात नगर परिषदेच्या वतीने विसर्जनाची सोय करण्यात आली होती. हातलादेवी तलाव परिसरात विसर्जनासाठी बोटही उपलब्ध होती. या ठिकाणी साडेपाच हजार गणेशमूर्तींचे विसर्जन झाले.
विसर्जन विहिरीजवळ पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. तसेच या भागात विसर्जनासाठी पालिकेचे कर्मचारी तैनात होते. या ठिकाणी ३ हजार मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.
१५ गणेश मूर्ती पालिकेकडे जमा
हातलादेवी तलावात २५ गणेश मंडळांनी मूर्तींचे विसर्जन केले. विसर्जन विहिरीत १९ गणेश मंडळांनी मूर्ती विसर्जित केल्या आहेत. १५ गणेश मंडळांनी नगर परिषदेकडे मूर्ती जमा केल्या आहेत. गणेशभक्तांनी सोबत आणलेले निर्माल्यही पालिकेकडून संकलित करण्यात आले. जवळपास ५ टन निर्माल्य जमा झाल्याची माहिती नगर परिषदेचे मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टे यांनी दिली.