उस्मानाबाद : तालुक्यातील तेर येथे राजकुमार लोमटे यांच्या राहत्या घरी गोव्यात निर्मित आणि गोव्यातच विक्रीसाठी असलेली ५ लाख ४२ हजार ९५० रुपये किमतीचा अवैध साठा धाड टाकून जप्त करण्यात आला आहे. येथील राज्य उत्पादन शुल्क कार्यालय आणि पोलिसांनी ही कार्यवाही केली.
राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक विजय चिंचाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात परराज्यातून येणारे मद्य, कर चुकविलेले मद्य इत्यादी प्रकारच्या अवैध मद्य विक्रीवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत कार्यवाही करून, गुन्हे नोंदविण्याची मोहीम चालू आहे. तेर येथील राजकुमार लोमटे त्याच्या घरी अवैधरीत्या गोवा राज्य निर्मित आणि गोवा राज्यात विक्रीसाठी असलेला विदेशी मद्याचा साठा केल्याची माहिती १२ सप्टेंबर रोजी खबऱ्यामार्फत उत्पादन शुल्क विभागाच्या पथकास मिळाली. त्यानुसार, उत्पादन शुल्कच्या पथकाने तेर येथील राजकुमार अनिल लोमटे यांच्या घरी धाड टाकली. यावेळी त्यांच्या ताब्यातून ५ लाख ४२ हजार ९५० रुपये किमतीचा गोवा राज्य निर्मित आणि गोवा राज्यात विक्रीसाठी असलेला विदेशी मद्याचा मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त मुद्देमालात गोवा राज्यात विक्रीसाठी असलेला विदेशी मद्य कंपनीच्या १८० मिली क्षमतेच्या एक हजार ३९२ बाटल्या, १८० मिली क्षमतेच्या ९१२ बाटल्या, १८० मिली क्षमतेच्या ८६४ बाटल्या, १८० मिली क्षमतेच्या १९२ बाटल्या, विविध ब्रॅन्डचे एकूण ९६७ बनावट लेबल असलेले गोवा राज्य निर्मित आणि गोवा राज्यात विक्रीसाठी असलेला विदेशी मद्याचा एकूण ७० बॉक्स (३,३६० बाटल्या) मद्यसाठा जप्त करण्यात आला. गुन्ह्यातील आरोपी आणि इतर दोन फरार आरोपी यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९चे कलम ६५(ए)(ई)(एफ), ८१,८३,९० आणि १०८ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक आर.एस. कोतवाल, प्रभारी भरारी पथक निरीक्षक पी.जी. कदम, दुय्यम निरीक्षक एस.के. शेटे, भूमचे दुय्यम निरीक्षक बी.एल. ओहोळ, एस.पी. काळे, डी.व्ही. भराट, ढोकी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बनसोडे, पोलीस उपनिरीक्षक गाडे, डोंबाळे एल.ए., जवान आर.आर. गिरी, एम.पी. कंकाळ, व्ही.आय. चव्हाण, पोलीस नाईक तरटे, जिनेवाड, गुंड आणि महिला पोलीस स्वामी यांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास उस्मानाबाद राज्य उत्पादन शुल्कचे दुय्यम निरीक्षक एस.के. शेटे हे करीत आहेत.