उस्मानाबाद : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शासनाने २२ एप्रिलपासून राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात केले आहेत. शासकीय कार्यालयातही १५ टक्के कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश आहेत. शिवाय, रुग्ण वाढू लागल्याने नागरिकही घरातच राहणे पसंत करीत आहेत. त्यामुळे नेहमी गजबजून असणारा शासकीय कार्यालयाच्या परिसरातही शुकशुकाट पहावयास मिळत आहे.
एप्रिल महिन्यापासून राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक झपाट्याने वाढू लागले आहेत. वाढत्या संसर्गास आळा घालण्यासाठी शासन स्तरावरून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजल्यापासून राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली होती. काही दुकाने उघडी ठेवण्यास मुभा देण्यात आली होती. त्यामुळे नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडत होते. त्यामुळे रस्त्यावर तसेच शासकीय कार्यालयाच्या परिसरातही मोठ्या संख्येने गर्दी होत होती. गर्दी टाळण्याकरिता जिल्हा प्रशासनाने २२ एप्रिल रोजी विविध निर्बंध लागू केले आहेत. शासकीय कार्यालयात १५ टक्के उपस्थित राहण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यामुळे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, जिल्हा मध्यवर्ती इमारत, सामाजिक न्याय भवन इमारतीच्या परिसरात दिवसभर शुकशुकाट पहावयास मिळाला.
मध्यवर्ती प्रशासकीय इमारत
शहरातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत कृषी, उत्पादन शुल्क, भूजल सर्वेक्षण, जिल्हा उपनिबंधक, वनविभाग, जिल्हा हिवताप कार्यालय, नेहरू युवा केंद्र, कौटुंबिक न्यायालय असे विविध कार्यालये आहेत. या ठिकाणी कामानिमित्त दिवसभर नागरिकांची रेलचेल असते. शुक्रवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास परिसर ओस पडला होता.
सामाजिक न्याय विभाग
शहरात भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाची इमारत आहे. या ठिकाणी जात पडताळी कार्यालय, सहायक समाजकल्याण आयुक्त कार्यालय, पोस्टऑफिस, महात्मा फुले महामंडळ, अण्णा भाऊ साठे महामंडळ, वसंतराव नाईक महामंडळाची कार्यालये आहेत. या ठिकाणी जिल्हाभरातून नागरिक तसेच विद्यार्थी उपस्थिती लावत असत. मात्र कोरोनाचा संसर्ग वाढल्याने या कार्यालयाकडे नागरिक फिरकेना झाली आहेत. शुक्रवारी दुपारी १२.१५ वाजता, असा शुकशुकाट होता.
जिल्हाधिकारी कार्यालय
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाभरातील नागरिक मोठ्या संख्येने येत असतात. मात्र, कार्यालयातही नागरिकांना विनाकारण येण्यास मनाई आहे. शिवाय, कार्यालयातील काही कर्मचारीही मागील काही दिवसात पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे नागरिक या ठिकाणी जाण्याचे टाळत आहेत. त्यामुळे या कार्यालयाचा परिसरातही सुरक्षारक्षकाशिवाय अन्य कोणी पहावयास मिळत नाही.