कळंब : आलेला प्रत्येक क्षण त्यांच्यासाठी तसा कष्टप्रदच... वर्षभरात त्यांनी असंख्य भयप्रद अन् तितकेच निःश्वास सोडलेले चेहरे पाहिले. खूप काही अनुभवलं अन् सोसलंही. आप्तस्वकीयांत ‘डिस्टन्स’ पाळत, समाजापासून अलिप्त राहत कळंब उपजिल्हा रुग्णालयातील तरुण डॉक्टरांची ही ‘त्रिमूर्ती’ हजारोंसाठी देवदूत म्हणून कार्यरत राहिली असली, तरी हा काळ मात्र त्यांच्यासाठी ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ यापेक्षा काही वेगळा नव्हता.
गतवर्षी ११ मे रोजी तालुक्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. यानंतरच्या पुढच्या वर्षभरात कोविडचा इवलासा ‘व्हायरस’ भल्यामोठ्या जगाला हतबल करणारा ठरला. पहिल्या लाटेतील ‘लॉकडाऊन’ ते ‘अनलॉक’ हे पर्व पाहत असतानाच अनेकांना कोरोनाचा स्पर्श झाला. यानंतर थोडंसं सुरळीत झालं नाही तोवर दुसरी लाट उसळली. कोरोनाच्या या मागच्या वर्षभरात तालुक्यातील पाच हजारांहून अधिक लोकांना ‘पॉझिटिव्ह’ होत अनेक ‘निगेटिव्ह’ गोष्टींना तोंड द्यावे लागले. व्यक्तिगत, सार्वजनिक जीवन विस्कळीत झाले. अनेकांना गंभीर आरोग्यविषयक संकटाला तोंड द्यावे लागले. याकाळात बाधितांना विविध कोरोना योद्ध्यांची मोलाची लाथ लाभली. यात महत्त्वाचे स्थान आहे ते आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांचे.
कळंब उपजिल्हा रुग्णालयातील सर्वच डॉक्टरांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. जीवन वायदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली चांगले टीमवर्क केले. यातही ‘तरुण तुर्क’ असलेल्या डॉ. स्वप्निल शिंदे, डॉ. प्रशांत जोशी व डॉ. रूपेश चव्हाण या ‘त्रिमूर्ती’ चे कोविड काळातील योगदान पुढील काळात नक्कीच संस्मरणीय असे राहणार आहे. कोविड ‘ड्युटी’ ते वैयक्तिक जीवन अन् दिनचर्या याचा धांडोळा घेतला असता ही ‘त्रिमूर्ती’ थोडेबहूत झोपेल तेवढंच काय ती निश्चिंत असल्याचे समोर आले. दिवसरात्र कोरोनाशी लढा शिवाय घरादारात वावरताना स्वतःपेक्षा इतरांची जास्त काळजी घ्यावी लागली. वर्षभरात चारेक हजार रुग्णांशी त्यांचा थेट संबंध आला. आरोग्य सेवेसह आधार दिला, समुपदेशन केले. यामुळेच रुग्ण आणि डॉक्टर यांच्यात एक वेगळा ऋणानुबंध निर्माण झाल्याचे डॉ. प्रशांत जोशी यांनी सांगितले.
त्यांच्या चोहऱ्यावरील आनंद मला परत ‘ऊर्जा’ देतो
वय वर्षे ३२. पाच वर्षे आप्तस्वकीयांना सेवेचा अनुभव पाठीशी असलेले डॉ. प्रशांत जोशी हे उपजिल्हा रुग्णालयात आयुष विभागात कार्यरत आहेत. मागच्या वर्षभरात कोविड उपचार व केअर सेंटरमध्ये त्यांचे काम अतुलनीय. स्वत: कोमॉरबीड असतानाही अहोरात्र रुग्णांसाठी राहून घेतलेले हे व्यक्तिमत्त्व सकाळी नऊ, दहाला राऊंड ते प्रशासकीय कामकाज अशा विविध टप्प्यांवर दिवसभर ‘अॅक्टिव्ह मोड’वर असते. उपचार, समुपदेशन करत करत नागरिक व नातेवाईक यांच्याशी ‘कनेक्ट’ झालेले असते. दिवसरात्र मेहनत असते, कामाचा ताण येतो. मात्र, बरं होऊन घरी जाताना रुग्णांनी व्यक्त केलेला आनंद परत ऊर्जा देते, असे डॉ. प्रशांत जोशी यांनी सांगितले.
दुपारच्या साडेतीनला सकाळच्या जेेवणाचा मुहूर्त
डॉ. स्वप्निल गणेशराव शिंदे यांचे वय ३४. उपजिल्हा रुग्णालयात बालस्वास्थ्य कार्यक्रमात नियुक्त असले तरी मागच्या वर्षभरात कळंबच्या कोविड सेंटरचा भार त्यांच्या खांद्यावर. भल्या सकाळीच पॉझिटिव्ह लिस्टमधील लोकांना संपर्क, सल्ला अन् कोविड सेंटरवर प्रवेश, असे डॉ. शिंदे यांचे काम सुरू होते. त्यानंतर रॅपिड टेस्ट, बाधितांसह ग्रामीणमधील बाधितांची सोय डॉ. शिंदे करतात. तोपर्यंत तीन, साडेतीन वाजतात. यावेळी दुपारचे जेवण होते. मग परत आढावा, समुपदेशन, शिफ्टिंग चालूच असते. परत रात्री तापमान, ओटू रिपोर्ट येतात, त्यांना संदर्भसेवा निश्चित करावी लागते. या काळात दीडेशवर कॉल येतात. सर्व स्वीकारार्ह, कोणालाही हर्ट करायचे नाही. आजवर कॉल आलेल्या एकालाही बेड नाही असे झाले नाही, असे डॉ. स्वप्निल शिंदे यांनी सांगितले.
मुक्कामपोस्ट कोविड सेंटर, वर्षभरात चारदा घरी गेलो
२९ वय असलेले डॉ. रूपेश चव्हाण मागच्या वर्षभरापासून कळंब उपजिल्हा रुग्णालयाच्या कोविड सेंटरमध्ये काम करतात. विशेषत: आयटीआय व सोजर सेंटरवरची धुरा त्यांच्याकडे. अहोरात्र सेवेत असलेले हे तरुण डॉक्टर वर्षभरात केवळ तीन, चार वेळा आपल्या घरी गेले. जवळपास मुक्काम कोविड सेंटरवरच. याठिकाणी रात्रभर ते रुग्णसेवेस सतर्क असतात. आपलं पण काही खरं नाही, याच भावनेने आलेल्या रुग्णास डॉ. चव्हाण यांच्या आपुलकीच्या शब्दाने हायसं वाटतं. सध्या तर गंभीर रुग्ण असलेल्या सेंटरवर ते काम करीत आहेत. यामुळे अधिक अलर्ट राहावे लागते. उपचार, सल्ला व गरज पडल्यास शिफ्ट करण्याची जबाबदारी ते पार पाडतात. या कठीण काळात घरी जायचा मोह आवरतो, असे डॉ. रूपेश चव्हाण यांनी सांगितले.