उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी अखेर शिवसेना नेते तथा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती करतानाच जिल्ह्याला प्रथमच सहपालकमंत्री देण्यात आला असून, राष्ट्रीय समाज पार्टीचे महादेव जानकर यांच्या खांद्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. उस्मानाबादच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी यापूर्वी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याकडे होती. मात्र, डॉ. सावंत जिल्ह्याकडे फारसे फिरकत नसल्याने सावंत यांच्या पालकमंत्री पदाचा ना शिवसेनेला फायदा झाला ना नागरिकांना. त्यामुळेच सावंत यांच्याऐवजी इतर मंत्र्याकडे पालकमंत्रीपद सोपवावे, अशी मागणी मागील काही महिन्यांपासून होत होती. पालकमंत्री सावंत यांच्याकडे असलेल्या आरोग्य विभागाचा कारभारही ते सुधारू न शकल्याने त्यांच्याबद्दल नाराजी वाढत होती. त्यातच कळंब तालुक्यातील काही शिवसैनिकांनीही पालकमंत्री हटविण्याची मागणी करीत खळबळ उडवून दिली होती. या पार्श्वभूमीवर उस्मानाबादसह राज्यातील आठ जिल्ह्यात नव्याने पालकमंत्री नियुक्त करण्यात आले. विशेष म्हणजे, या माध्यमातून सहपालकमंत्र्यांची संकल्पना पहिल्यांदाच राबविण्यात आल्याचे दिसून येते. नवे पालकमंत्री दिवाकर रावते हे आक्रमक असल्याने जिल्ह्यातील ढासळलेल्या प्रशासन व्यवस्थेला चाप बसेल, अशी अपेक्षा जिल्हावासियांतून व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
दिवाकर रावते सांभाळणार आता जिल्ह्याचे पालकत्त्व
By admin | Updated: December 30, 2016 00:00 IST