कळंब : समाजातील विविध घटकातील १३० व्यक्तिंना संविधान प्रतींचे वाटप करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. 'नाचून नव्हे तर वाचून' महामानवांची जयंती साजरी करण्याचा हा उपक्रम कळंब येथील दयावान प्रतिष्ठानने राबवला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० जयंती यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष काळजी घेत साजरी केली गेली. यानुसार भाजपाचे तालुकाप्रमुख अजित पिंगळे व डिकसळचे सरपंच अमजद मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब येथील दयावान प्रतिष्ठानने यंदा 'महामानवांची जयंती वाचून नव्हे तर नाचून' या विचाराने साजरी करण्याचा संकल्प केला होता. यानुसार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष इम्रान मुल्ला यांनी जयंतीनिमित्त आदर्श उपक्रम हाती घेतला. शहराच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा सुवर्णा मुंडे यांच्यापासून भाजपा तालुकाध्यक्ष अजित पिंगळे, प्राचार्य डॉ. अशोकराव मोहेकर ते डॉ. प्रतापसिंह पाटील, प्रा. डॉ. संजय कांबळे ते ज्येष्ठ पत्रकार माधवसिंग रजपूत, शिवाजी गिड्डे ते ज्येष्ठ नेते डी. जी. हौसलमल अशा शिक्षण, प्रशासन, आरोग्य, समाजसेवा, पत्रकारिता, व्यवसाय, राजकारण या विविध क्षेत्रातील १३० व्यक्तिंना भारतीय संविधानाची प्रत भेट देण्यात आली.
यासाठी प्रतिष्ठानचे इम्रान मुल्ला, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष विकास कदम, अभय गायकवाड, रणजीत देशमाने, तानाजी चव्हाण, राहुल यादव, इम्रान काझी, शफीक शेख, रौफ शेख, शौकत शेख, इम्रान खान, सम्राट गायकवाड, करण गायके, शोयब काझी, फारूख पठाण, मोसिन मुल्ला यांनी परिश्रम घेतले.