उस्मानाबाद : राज्य परिवहन महामंडळाने मागील तीन वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करून येथील मध्यवर्ती बसस्थानकात महिलांसाठी हिरकणी कक्ष सुरू केला होता. मात्र, सध्या कक्ष कुलूप बंद असल्याने महिला प्रवाशांची कुचंबणा होत आहे.
एसटी महामंडळाने प्रवाशांना सुविधा देण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेऊन त्यात हिरकणी कक्ष नावाची योजना संपूर्ण महाराष्ट्रात सुरू केली. यात बसस्थानकावर महिलांना आपल्या बाळाला स्तनपान करता यावे, यासाठी एक कक्ष उपलब्ध करून दिला. एक टेबल आणि खुर्ची या कक्षात उपलब्ध राहायची. काही दिवस ही योजना सुरळीत चालली. एसटी महामंडळाकडून महिलांसाठी अशा प्रकारची सुविधा उपलब्ध आहे, याबाबत ध्वनिक्षेपकाहून माहिती महिला प्रवाशांना दिली जात होती. त्यामुळे अनेक महिला माहिती ऐकून या योजनेचा लाभ घेत होत्या. मात्र, मागील वर्षभरापासून कक्ष बंदच राहत आहे. परिणामी, बाळाला स्तनपान करताना महिला प्रवाशांची कुचंबणा होत आहे. अनेक महिला बाळाला स्तनपान करताना आडोसा शोधताना आढळून येतात. ध्वनिक्षेपकावरून कक्षाची माहिती सांगितली जाते. मात्र, कुलूप बंद असल्याने महिलांना कक्षापासून माघारी परतावे लागते. हिरकणी कक्ष स्तनदा मातेसाठी सुरू ठेवण्यात यावा, अशी मागणी महिला प्रवाशांतून होत आहे.
कोट...
हिरकणी कक्षाचा महिलांनी लाभ घ्यावा
बसस्थानकातील हिरकणी कक्ष दोन वर्षांपूर्वी सुरू झालेला आहे. या कक्षाची चावी नियंत्रण कक्षात ठेवण्यात आली आहे. स्तनदा माता प्रवाशांनी चावी मागितल्यानंतर तो उघडून दिला जात आहे.
पी.एम. पाटील, आगार प्रमुख, उस्मानाबाद बसस्थानक
कक्षाबाबत महिला अनभिज्ञ
राज्य परिवहन महामंडळाने प्रत्येक बसस्थानकांत हिरकणी कक्ष सुरू केला आहे. मात्र, अनेक महिलांना हा कक्ष कुठे आहे व कोणासाठी आहे, याची माहितीच नसल्याचे समोर आले आहे. ज्या महिलांना या कक्षाबाबत माहिती आहे, त्या महिलाही कक्ष कुलूप बंद असल्यामुळे याबाबत महामंडळाकडे विचारणा करीत नसल्याचे दिसून आले.
वर्षभरापासून कक्षाला दिसते कुलूप
जवळपास दोन वर्षांपूर्वी राज्य परिवहन महामंडळाने बसस्थानकात हिरकणी कक्ष सुरू केला होता. या कक्षामुळे अनेक स्तनदा मातांना दिलासा मिळाला होता. वर्षभर कक्ष सुरळीत सुरू होता. मात्र, मागील वर्षापासून या कक्षाकडे महामंडळाने दुर्लक्ष केल्याने कक्ष कुलूप बंदच राहत आहे.