ढोकी : धाराशिव तालुक्यातील ढोकी येथे पोलीस स्टेशन परिसर व सुभाषराव देशमुख यांच्या घराच्या परिसरामध्ये शनिवारी आढळून आलेल्या मृत कावळ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाल्याची पुष्टी झाली असून, या घटनेनंतर पशुसंवर्धन विभागाने तातडीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत.
ढोकी गावातील पोलीस स्टेशन परिसर व सुभाषराव देशमुख यांच्या घराच्या परिसरामध्ये पाठीमागे मोकळ्या जागेत शनिवारी एकूण जवळपास पन्नास कावळे अचानक मृतावस्थेत आढळले होते. या घटनेची माहिती मिळताच पशुसंवर्धन विभागाने मृत कावळ्याचे नमुने प्रयोगशाळांमध्ये पाठवले होते. तपासणीनंतर कावळ्याचा मृत्यू बर्ड फ्ल्यूमुळे झाल्याचे स्पष्ट झाले. बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावातील कुक्कुटपालन केंद्रांवर निर्जंतुकीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. शिवाय बाधित परिसरातील सर्व कोंबड्यांची तपासणी करण्यात येत असून, रोगाचा फैलाव होऊ नये म्हणून इतर गावांमध्येही खबरदारी घेतली जात आहे.
घाबरू नका, पण सूचनांचे पालन करादरम्यान, पशुसंवर्धन विभागाने नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे, तसेच पक्ष्यांच्या आरोग्याबाबत सतर्क राहण्याचे सूचित केले आहे. धाराशिव जिल्ह्यातील बर्ड फ्ल्यूचा हा प्रकार कुक्कुटपालन व्यवसायावर परिणाम करू शकतो. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाकडून आलेल्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असेही आवाहन उपसरपंच अमोल समुद्रे यांनी केले आहे.
अलर्ट झोन जाहीरढोकी शहरातील पोलीस स्टेशन परिसर व सुभाषराव देशमुख यांच्या घराचा परिसर अलर्ट झोन म्हणून घोषित करण्यात आला आला. दरम्यान, ग्रामपंचायतीने खबरदारी म्हणून ढोकी गावातील सर्व कुक्कुटपालन व्यवसायिक व मांस विक्री करणाऱ्यांची बैठक घेऊन रवीवारपासून मांस विक्री बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार सर्व दुकाने बंद आहेत.