कळंब : कोरोना निर्बंधामुळे शाळा, महाविद्यालये ओस पडली आहेत. आठवडी बाजाराचे कट्टे बेवारस आहेत. सार्वजनिक ठिकाणी वावर नसल्याने शुकशुकाट वाढला आहे. या वातावरणाचा फायदा घेऊन अशी बहुतांश ठिकाणे आता गुन्हेगारांचे अड्डे बनू पाहत आहेत. त्यामुळे गावातील कायदा व सुव्यवस्था ही धोक्यात येण्याची शक्यता आहे.
कोरोनाने एकीकडे उद्योग -व्यापाराला मंदीचे दिवस दाखविले असताना गुन्हेगारांना मात्र अच्छे दिन आणले आहेत. गावागावात दोन नंबर धंद्यामध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. मटका, गुटखा, जुगार याबरोबर चोरटी दारूविक्रीही शहरासह अनेक गावात तेजीत आहे. यासाठी आता शाळा, महाविद्यालय, आठवडी बाजार परिसर या मंडळींचा अड्डा बनला आहे. कळंब शहरातील आठवडी बाजार परिसरात सध्या रात्री अनेक विचित्र प्रकार चालू असल्याचे त्या परिसरातील नागरिक सांगतात. विविध नशा करणारी मंडळी येथे मुक्कामी असतात. काही नशिले पदार्थ विकणाऱ्यांनी या भागात दुकानदारी चालू केल्याची माहिती आहे. रात्रभर येथे गुन्हगारी प्रवृत्तीचा राबता राहत असल्याने हा भाग आता आसपासच्या व्यापारी, रहिवासी यांच्यासाठी धोकादायक होऊ पाहत आहे. त्याच परिसरातील जुन्या दूध डेअरी भागातही आता सुरट, झन्नामन्ना, टायगर, अशा जुगारी खेळाबरोबर इतरही अवैध धंद्यांनी बस्तान बसविले आहे. कळंबच्या गुन्हेगारी मंडळींचा तो आता हक्काचा ठिकाणा झाला आहे. अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या मंडळींचा तिकडे राबता असल्याने हा भाग शहरातील मोस्ट डेंजर भाग म्हणून ओळखला जातो.
चौकट -
शाळा ठरताहेत ‘सेफ झोन’
शहरातील तसेच तालुकाभरातील शाळा तसेच सार्वजनिक ठिकाणेही गुन्हेगारांसाठी सेफ झोन ठरत आहेत. शाळा भरत नसल्याने तिकडे वर्दळ कमी असते. त्यामुळे ‘नसते उद्योग’ करण्यास ही ठिकाणे वापरली जात आहेत. जिथे शाळा वा सार्वजनिक ठिकाणे नागरिकांच्या दृष्टिक्षेपात आहेत, तिथे या मंडळींना शिरकाव करता येत नाही. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील अशा ठिकाणावर लक्ष ठेवण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करावी लागणार आहे.
गावठी दारूनिर्मिती वाढली !
तालुक्यातील शिराढोण भागातील काही तांड्यावर गावठी दारू निर्मिती मोठ्या प्रमाणावर केली जात असल्याची माहिती आहे. कोरोनामुळे या भागात बाहेर गावातील काही मंडळी बेकायदेशीर दारू निर्मिती उद्योगात कार्यरत झाल्याची चर्चा मध्यंतरी होती. त्यावरही आता पोलिसांनी कार्यवाहीचा फास आवळण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे या भागातील काही वस्त्या गावठी दारू बनविण्यासाठी व विक्रीसाठी उस्मानाबादसह शेजारील लातूर व बीड जिल्ह्यात प्रसिद्ध असताना यंत्रणा त्यांच्यावर कार्यवाही करण्यास धजावत असल्याचे चित्र आहे.
पेट्रोलिंग वाढविण्याची आवश्यकता
कळंब तालुक्यात कळंब, शिराढोण व येरमाळा येथे स्वतंत्र पोलीस ठाणे आहेत. त्या त्या भागातील पोलिसांनी आता अशी निर्जन स्थळे शोधून त्या ठिकाणी रुजू होऊ पाहिलेली गुन्हेगारी व गुन्हेगार मोडून काढले पाहिजेत. त्यासाठी पेट्रोलिंगचे वेळापत्रक तसेच कर्मचारीही ऐनवेळी ठरविल्यास या गुन्हेगारांवर अंकुश येणार आहे.
कोट.......
पेट्रोलिंग वाढवणार, कार्यवाही करणार
कळंब पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा निर्जन स्थळांची माहिती गोळा करून तेथे चुकीची कामे होत असतील तर कार्यवाही केली जाईल. यासाठी बिट मार्शलचे पेट्रोलिंग वाढविण्यात येणार आहे. गुन्हेगारांची कोणत्याही परिस्थितीत गय केली जाणार नाही. नागरिकांनीही कोठे चुकीच्या, बेकायदेशीर घटना घडत असतील तर त्याची पोलीस ठाण्यात माहिती द्यावी, कार्यवाही करण्यात येईल.
- यशवंत जाधव, पो.नि. कळंब