कळंब : शहरातील इदगाह मैदानासह इतर विकासकामांसाठी सहा कोटी रुपयांचा निधी देण्याचे साकडे कळंब राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून घातले. याबाबत संबंधित मंत्र्यांना निधी वितरणाबाबत सूचना देऊ, असे आश्वासन पवार यांनी दिल्याचे या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
शहरातील विविध विकासकामांना न. प.ने अनेक अडचणीतून मार्ग काढत गती दिली आहे. मात्र, अनेक कामे पुरेशा निधीअभावी चालू करता आली नाहीत. यातील मुस्लिम समाज बांधवांच्या इदगाह मैदानासाठी १ कोटी, शिवसृष्टी विकसित करण्यासाठी १ कोटी, आरक्षण क्र. ३७ मधील महिलांसाठीच्या उद्यानात व्यायाम व खेळणी साहित्य बसविण्यासाठी १ कोटी, आरक्षण क्र. ३२/३३ मध्ये रस्ते विकसित करण्यासाठी १ कोटी, पंडित जवाहरलाल नेहरू बालोद्यानमध्ये नवीन खेळणी बसविण्यासाठी ५० लाख तसेच मल्टिपर्पज हॉल येथे पार्किंग व्यवस्था व विद्युतीकरणासाठी दीड कोटी रुपयांच्या निधीची मागणी यावेळी करण्यात आली.
उस्मानाबाद जिल्ह्याचे संपर्कमंत्री संजय बनसोडे यांच्यासह उपनगराध्यक्ष संजय मुंदडा, राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष सागर मुंडे, सुधीर भवर यांच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री पवार यांना नगराध्यक्षा सुवर्णा मुंडे, उपनगराध्यक्ष संजय मुंदडा, राष्ट्रवादीचे गटनेते लक्ष्मण कापसे यांच्या सह्या असलेले निधी मागणीचे निवेदन दिले. याबाबत अजित पवार यांनी सकारात्मक भूमिका व्यक्त केली असून, निधी उपलब्ध होईल, अशी माहिती उपनगराध्यक्ष संजय मुंदडा यांनी दिली.