कळंब : शहरातून जाणाऱ्या खामगाव -पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर दुभाजक बसाविल्याने शहरातील पंडित जवाहरलाल नेहरू बालोद्यानात उभारलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याकडे मोठा वळसा घालून जावे लागणार आहे. यासाठी उद्यानासमोरील दुभाजक हटवून थेट रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी भाजप अनुसूचित जाती विभागाने संबंधित कंपनीकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कळंब शहर व तालुक्यातील अनेक नागरिक बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होण्यासाठी या उद्यानात येतात. जेष्ठ नागरिक, लहान बालके यांचेही हे उद्यान हक्काचे ठिकाण आहे. या समोरून जाणाऱ्या महामार्गावर ऐन उद्यानाच्या समोर रस्ता दुभाजक कंत्राटदार कंपनीने बसविला आहे. त्यामुळे सर्वांचीच गैरसोय होणार आहे. तसेच अहिल्यादेवी होळकर चौकाला वळसा घालून यावे लागणार आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी उद्यानासमोर दुभाजक न बसवता रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी या निवेदनात केली आहे. निवेदनावर भाजप अनुसूचित विभागाचे सतपाल बनसोडे, आबासाहेब रणदिवे, धनंजय कोळपे, धनंजय चिलवंत आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.