उस्मानाबाद : निझामाच्या रझाकारींनी गावागावात, मनामनात आपल्या अमानवीय अत्याचारांनी दहशत निर्माण केली होती. त्यांच्या स्वैर वर्तनाला लोक वैतागून गेले होते. मनात चीड उत्पन्न झाली होती. यातूनच मुक्तिसंग्रामच्या लढ्याची ठिणगी ठिकठिकाणी पडली होती. या ठिणगीतूनच दत्तोबा भोसले नावाची आगीची ज्वाळा तयार झाली. रझाकारींना ही पराक्रमी ज्वाळा चांगलीच पोळली. त्यामुळे अल्पकाळातच रझाकारींमध्येही दत्तोबांची दहशत निर्माण झाली होती.
स्वतंत्र भारतात सामील होण्यास नकार देणाऱ्या निझाम राजवटीतील रझाकारींनी मराठवाड्यात थैमान घातले होते. लोकांच्या कत्तली सुरू होत्या. महिलांवर अत्याचार केले जात होते. अशा परिस्थितीत बाबासाहेब परांजपे, फुलचंद गांधी, अण्णाराव पाटील, रामचंद्र पाटील, दत्तोबा भोसले, रामभाऊ जाधव, मनोहर टापरे, शिवाजीराव नाडे, नामदेवराव नाडे, राजाभाऊ कुलकर्णी, विठ्ठल गणेश साळी, भगवान तोडकरी, नरहरराव ग. मालखरे व अनेक असे शूरवीर तरुण आपल्या मायभूला मुक्त करण्यासाठी स्वतःचे बलिदान द्यायला पुढे आली.
यातीलच एक दत्तोबा भोसले हे त्यांच्या शौर्यगाथांनी स्वातंत्र्यसैनिकांचे मुकुटमनी बनले. दत्तोबा भोसले हे आताच्या लातूर जिल्ह्यातील मातोळा गावचे. एका शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या दत्तोबांना शिक्षणाची मोठी आवड. ही आवड ओळखून पालकांनी त्यांना शिक्षणासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील हिप्परगा येथील राष्ट्रीय शाळेत पाठविण्यात आले.
येथे स्वामी रामानंद तीर्थ व अन्य नावाजलेल्या शिक्षकांच्या तालमीतून त्यांनी शिक्षणासोबतच, कसरती तसेच देशभक्तीचे धडे गिरविले. दररोज मातोळा ते हिप्परगा असा १६ किमी पायी प्रवास करताना दत्तोबा यांच्या मनात निझामाच्या त्रासामुळे रोषाचे बीजारोपण होत गेले. त्याला राष्ट्रभक्तीच्या शिक्षणाची जोड मिळाली अन् एक क्रांतिकारक घडला. पुढे त्यांनी सशस्त्र लढ्यात स्वत:ला झाेकून देत अनेक ठिकाणी कॅम्प उभारले. स्वत: निझामाची लेव्ही, शस्त्रे लुटून ती स्वातंत्र्यलढ्याच्या उपयोगात आणली. अनेक रझाकारांना कायमचे आडवे करून त्यांना सळो की पळो करून सोडले. त्यांच्या शौर्यगाथा सांगताना मातोळ्यासह उमरगा, लोहारा व इतरही भागांतील नागरिकांत अजही स्फुरण चढलेले पहायला मिळते. दत्तोबांनी जर कोणाला काखेत दाबले तर मेलाच समजा, दत्तोबा एकाच वेळी पाच-सहा जणांना आवळून ठेवू शकत होते, पुढून पन्नास माणसं जरी चाल करून आली तरी दत्तोबा एकट्याने तोंड द्यायचे धाडस राखत होते, असे कौतुकांनी भरलेले वर्णन नागरिक करतात. तत्कालीन कलेक्टरही झाले होते प्रभावित...
निझामाचे तत्कालीन कलेक्टर मोहम्मद हैदर यांनी त्यांच्या ऑक्टोबर कोअप पुस्तकात ठिकठिकाणी दत्तोबा भोसले यांचे वर्णन केलेले आहे. ते म्हणतात, दत्तोबा भोसले हा प्रचंड डेअरिंगबाज व्यक्तिमत्व होते. त्यांनी नरसिंगराव वकील यांच्या पर्यवेक्षणाखाली सुरू असलेल्या अनेक कॅम्पचे नेतृत्व केले. उस्मानाबाद जेलमध्ये माझी दत्तोबांशी भेट झाली होती. धडधाकट शरीरयष्टी कायम राखण्यासाठी ते मेहनती व्यायाम करीत असायचे. घोड्यांपेक्षाही अधिक वेगाने पळण्याची त्यांची क्षमता होती. अगदी एखाद्या मोटारकारलाही ते सहज हरवू शकत.
निझामाच्या सैन्यालाच लुटले...
निझामाचे सैनिक ससोरा लेव्ही जमा करून जात असताना सेलू येथे दत्तोबा यांनी त्यांच्यावरच हल्ला चढवीत ७ हजार ५०० रुपयांचा लेव्ही लुटून नेला. पुढे लोहारा येथील निझामाच्या खजिन्यावरही हल्ला करून येथून सरकारी पैसे लुटले. उमरग्याजवळील चाकूर पोलीस ठाण्यावर हल्ला करीत शस्त्रे पळवून नेली. दिवस असो की रात्र, धाडी व हल्ले करण्याच्या दत्तोबांच्या धाडसात वाढच होत होती. एकदा तर त्यांनी इर्ल्याच्या एका धनदांडग्या मारवाड्यास ओलीस ठेवले होते. लढ्यासाठी १ लाख रुपये देण्याची तयारी दर्शविल्यानंतर त्याला सोडण्यात आले, असा उल्लेखही कलेक्टर हैदर यांनी केलेला आहे.