पाथरुड : भूम तालुक्यातील पाथरुडसह परिसराला मंगळवार ते गुरूवार असे तीन दिवस पावसाने अक्षरश: झोडपून काढले. या पावसाने सर्वत्र शेतांमध्ये पाणीच पाणी साचले असून, काढणी सुरु असलेल्या सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात उभ्या असलेल्या हजारो हेक्टरवरील सोयाबीनला पावसाचा जबरदस्त तडाखा बसला आहे. तूर, कापूस, बाजरी या पिकांचेही पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.
पाथरुड परिसरात खरीप हंगामात उडीद, सोयाबीन या पिकांचा पेरा मोठ्या प्रमाणात झाला आहे. सध्या सोयाबीन पिकाची काढणी करुन राशी करण्यात येत आहेत. परंतु, दररोज पाऊस हजेरी लावत असल्याने तसेच गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी काढून ठेवलेल्या सोयाबीन पिकाचे भिजून नुकसान झाले आहे. त्यामुळे उडीदपाठोपाठ सोयाबीनलाही पावसाचा फटका बसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. दरम्यान, उभ्या असलेल्या सोयाबीनसह तूर, कापूस, बाजरी, कांदा पिकाचेदेखील पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शासनाने पंचनामे करुन नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.