मुरुम : शहर व परिसरात मागील दोन दिवसांपासून अधूनमधून संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे उडीद, मुगाच्या राशी खोळंबल्या असून, काढणीला आलेल्या शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.
मुरुम शहर व परिसरातील आलूर, केसरजवळगा, कोथळी, बेळंब, अचलेर, कंटेकूर, तुगाव, नाईकनगर, भुसणी आदी भागांत मागील दहा दिवसांपासून उडीद, मुगाच्या राशी सुरू आहेत. मात्र, ऐन काढणीच्या काळात अधुनमधून पाऊस येत असल्याने ही पिके पाण्यात भिजून नुकसान होत आहे. शिवाय राशीच्या लागवडीचा खर्च देखील दुपटीने वाढला आहे. अनेक संकटांवर मात करून शेतकऱ्यांनी वर्षभर काबाडकष्ट करून आपल्या शेतात पिके जगवली. मात्र, नैसर्गिक आपत्तीमुळे लागवडसाठीचा खर्च जाऊन पदरात दमडाही पडत नसल्याने शेतकरी आधीच मेटाकुटीला आला आहे.
सोमवारी पहाटे शहर व परिसरात रिमझिम पावसाला सुरुवात झाली. यानंतर दुपारी तीन वाजेपर्यंत हा पाऊस सुरू होता. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. रात्री पुन्हा साडेआठच्या सुमारास पुन्हा पाऊस सुरू झाला. पहाटेपर्यंत पावसाच्या सरी सुरूच होत्या. या पावसामुळे परिसरातील काढणीला आलेल्या उडीद, मुगाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी चिंतीत झाला आहे. पेरणी व राशीच्या लागवडीचा खर्च कुठून व कसा करायचा? कर्ज कसे फेडायचे, याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. मंगळवारीही दिवसभर परिसरात ढगाळ वातावण होते.
चौकट........
बाजार समितीत आवकही घटली
मुरुम कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील आठ दिवसांपासून दररोज चारशे ते पाचशे पोते उडीद आणि मुगाची आवक विक्रीसाठी येत होती. मात्र, पावसामुळे आणि सुट्यांमुळे आवकदेखील सोमवारी व मंगळवारी मंदावल्याचे दिसून आले. पावसामुळे राशी खोळंबल्याने आवकही मंदावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसोबतच बाजार समितीलाही पावसाचा मोठा फटका बसल्याचे दिसून येते. या बाजार समितीत उडदाला ७ हजार २०० ते ६ हजार ३०० रुपये भाव होता, तर मुगाला ७ हजार ते ६ हजार ५०० रुपये भाव होता.
यंत्राद्वारे मळणीच्या दरात दुपटीने वाढ
केसरजवळगा येथील शेतकरी अनिल गुरव यांनी आपल्या तीन एकरांत उडीद आणि तुरीची पेरणी केली आहे. सध्या उडीद काढणीला आला आहे. मात्र, ऐन काढणीच्या काळात पाऊस झाल्याने संपूर्ण उडीद पाण्यात भिजून हजारो रुपयांचे नुकसान झाले. राशीसाठी मजूरही वेळेवर मिळत नसल्याने पंचायत झाली आहे. मळणी यंत्रवालेही ५० किलोच्या एका पोत्यासाठी ३०० ते ४०० रुपये आकारत आहेत. शेतमजूर आणि मळणीयंत्र मालकाच्या कचाट्यात शेतकरी भरडला जात आहे. मागील वर्षी २०० रुपये दर होता. मात्र, या वर्षी डिझेलचे भाव वाढल्याचे कारण पुढे करून मळणीचे भाव चक्क दुपटीने वाढवले आहेत.