सध्या रबी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, ऊस पिके जोमात आली आहेत. या पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध आहे. मात्र, बोरगाव उपकेंद्रांतर्गत असलेल्या हंगरगा, जळकोट, जळकोटवाडी, सिंदगाव, बोरगाव, कुन्सावळी यासह काही तांड्यावर वीजपुरवठ्यात अनेक अडथळे येत आहेत. महावितरणकडून येथे आठ तास वीजपुरवठा केला जात असला तरी अनेक ट्रान्सफाॅर्मर कमी क्षमतेचे असून, फ्यूज जाणे, फ्यूज किंवा डीपी जळण्याच्या समस्या निर्माण होत आहेत. यासंदर्भात हंगरगा तांडा येथील शेतकरी वामन चव्हाण म्हणाले, विद्युत पुरवठा सतत खंडित होत असल्याने व भारनियमनाची वेळ वेगवेगळी असल्याने सतत विद्युत पुरवठ्याची वाट पाहावी लागत आहे. पाणी मुबलक आहे; परंतु विद्युत पुरवठा सुरळीत नसल्याने हातात आलेले पीक जाईल की काय, अशी भीती वाटत आहे.
कोट......
सर्व शेतकरी हे ऑटो स्टार्टर लावत आहेत. त्यामुळे विद्युत पुरवठा चालू झाला की सर्व मोटारी सुरू होतात. त्यामुळे डीपीवर ताण येऊन फ्यूज जाणे, डीपी जळण्याचे प्रकार वाढत आहेत. शेतकऱ्यांनी ऑटो स्टार्टर न लावता स्टार्टरपूर्वी थ्री फ्यूज कॅपेसिटर जोडावे. असे केल्यामुळे मोटार चालू होताच मोटार जास्त करंट खाणार नाही व डीपीतील फ्यूज उडणार नाही.
- हनुमंत सरडे, शाखा अभियंता, नळदुर्ग ग्रामीण