अणदूर : मागील वर्षांपासून कोरोनामुळे सर्वच व्यवसाय ठप्प असून, यातून टेलर व्यावसायिकही सुटलेला नाही. तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील शंभर टेलर व्यावसायिकांच्या मशीनच्या चाकांना देखील यामुळे ‘ब्रेक’ लागल्याने उदरनिर्वाह कसा भागवावा, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे.
अणदूर येथील वीस हजार लोकसंख्येच्या गावात पुरुष व महिला टेलरची संख्या जवळपास शंभराच्या घरात आहे, दिवसभर शिलाई काम करून या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो परंतु, कोरोनाच्या महामारीत गेल्या वर्षापासून या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. बाजारपेठेमध्ये रेडिमेड कपड्यांचा बोलबाला असला तरी उपजीविका भागवण्याइतपत टेलरकीचा व्यवसाय होत होता; परंतु, तोही व्यवसाय ठप्प झाल्याने आता कुणी मजुरीला जात आहे तर कुणी कर्ज काढून रोजचा खर्च भागवत आहे. चाक फिरल्याशिवाय व कात्री चालविल्याशिवाय त्यांची चूल पेटत नाही, ही वस्तुस्थिती आहे.
व्यवसाय बंद असल्याने दोन दिवाळीचे सण, लग्नसराई, रमजान ईद व अन्य सण समारंभ, शाळा बंद असल्यामुळे शाळांचे गणवेश हा सर्व व्यवसाय बुडाला. शासनाने बांधकाम मजूर, शेतकरी, अन्य कारागीरांना कोरोनाच्या संकटात आर्थिक मदतीचा हात दिला आहे. काही दानशूर संस्था, संघटनेच्यावतीने देखील अडचणीत असलेल्या लोकांना मदत सुरू आहे. परंतु, या व्यावसायिकांकडे अद्याप कुणाच्याच नजरा वळल्या नाहीत. शासनाने टेलर व्यावसायिकांनादेखील आर्थिक मदत करावी किंवा दररोज काही तास दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी माणिक निर्मळे, संजय काळेंसह अणदूर येथील अन्य व्यावसायिकांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.