भूम : शहारासह तालुक्यातील ९३ गावांपैकी ७४ गावांत कोरोनाने एन्ट्री केली असून, आजवर तालुक्यात १ हजार ३९८ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. सद्यस्थितीत तालुक्यात ९७ रुग्ण ॲक्टीव्ह आहेत.
कोरोना पहिली लाट थंडावली असे वाटत असतानाचदुसरी लाट सुरू झाली तरीही नागरिक मात्र अजूनही बेफिकीरपणे वागत असल्याचे दसित आहे. शहारासह तालुक्यात मार्च महिन्यात १३२ कोरोना रुग्ण निष्पन्न झाले आहेत. मात्र एप्रिल महिन्यात अवघ्या ७ दिवसात ६८ नागरिकांना कोरोना प्रादुर्भाव झाल्याचे समोर आले आहे. आजवर तालुक्यातील पाथरूड येथे ११०, ईट ८६ व घटनांदूर येथील ६७ नागरिकांना प्रादुर्भाव झाल्याने ही गावे हॉटस्पॉट म्हणून समोर आली आहेत. आजवर आढळलेल्या १ हजार ३९८ रुग्णांपैकी १ हजार २४९ नागरिकांनी कोरोनावर मात केली असून, ४९ जणांचा कोरोनाने बळी घेतला. दरम्यान, तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी आरोग्य विभाग जनजागृती करीत आहे. यास नागरिकांनी सहकार्य करून नियमांचे पालन करावे. तसेच प्रादुर्भाव रोखण्यासाठी लस घेणे गरजेचे असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी अमोल शिंगारे यांनी सांगितले.