उस्मानाबाद : जिल्ह्यात मागील महिन्याभरापासून कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने बाहेरगावी प्रवास करणाऱ्यांची संख्या घटली आहे. त्याचा फटका एस. टी.च्या शिवशाही बसलाही बसला आहे. सध्या उस्मानाबाद आगारातील १४पैकी १२ शिवशाही बसेस सुरु असून, या बसना प्रवाशांकडून अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले.
राज्य परिवहन महामंडळ उस्मानाबाद विभागातील उस्मानाबाद, उमरगा, तुळजापूर या तीन आगारांमध्ये १४ वातानुकूलित शिवशाही बसेस आहेत. या बसेसला गतवर्षी प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत होता. मात्र, कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने या बसेसना प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे दोन शिवशाही बस बंद करण्यात आल्या आहेत. लॉकडाऊनपूर्वी जिल्ह्यातील शिवशाही बसेसचा प्रतिदिन १ लाख ३० हजार किलोमीटर प्रवास होत होता. या बसफेऱ्यांतून दररोज ४१ लाखांचे उत्पन्न मिळत होते. मात्र, सध्या दररोज ८५ हजार किलोमीटरचा प्रवास होत असून, यातून महामंडळाला २७ लाख रुपये उत्पन्न मिळत आहे. दरम्यान, सध्या या बसेसना उस्मानाबाद जिल्ह्याऐवजी बार्शी, कुर्डवाडी या स्थानकातूनच काही प्रवासी मिळत आहेत.
रविवारी सर्वच गाड्या बंद
कोरोनाच्या फैलावाला प्रतिबंध बसावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने दर रविवारी जनता कर्फ्यू लागू केला आहे. जनता कर्फ्यूच्या दिवशी शिवशाही बसेस बंद ठेवण्यात येत आहेत.
उत्पन्न ३० टक्क्यांनी घटले
राज्य परिवहन महामंडळाच्या उस्मानाबाद विभागातील १४ बसेसचे प्रतिदिन ४१ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत होते. सध्या या बसेसच्या फेऱ्यांतून दिवसाकाठी २७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. गतवर्षीच्या तुलनेत उत्पन्नात ३० टक्क्यांनी घट झाली आहे.
जिल्ह्यातून मुंबई, पुण्याकडे जाणारे प्रवासी हे बहुतांश ग्रामीण भागातील असतात. ग्रामीण भागातून गहू, ज्वारी असे धान्य मुंबई, पुण्याला घेऊन जातात. त्यामुळे अनेक प्रवासी साध्या बसेसला पसंती देत असल्याचे पाहायला मिळते. तर मागील महिन्याभरापासून कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने वातानुकूलित बसने प्रवास करण्याचे प्रवासी टाळत असल्याचे एस. टी. महामंडळाकडून सांगण्यात आले.
बार्शी, कुर्डवाडी मार्गावर प्रतिसाद
उस्मानाबाद आगाराच्या ८ शिवशाही बसस्थानकातून धावत होत्या. सध्या ६ बसेस धावत असून, उस्मानाबाद - पुणे ४ बसेस, उस्मानाबाद - मुंबई २ बसेस, तुळजापूर स्थानकातून दोन शिवशाही बसेस पुणे मार्गावर धावत आहेत. उमरगा ते पुणे या मार्गावर २ बसेस प्रवाशांच्या सेवेत आहेत. सध्या या बसेसला जिल्ह्यातून प्रवाशांचा म्हणावा तेवढा प्रतिसाद नसला तरी बार्शी, कुर्डवाडी मार्गावर काही प्रवासी मिळतात, असे एस. टी. महामंडळाकडून सांगण्यात आले.
जिल्ह्यातील शिवशाही बसेसची संख्या
१४
सध्या सुरु असलेल्या शिवशाही
१२