उस्मानाबाद : कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याच्या मार्गावर असल्याचे दिलासाजनक आकडे गेल्या दोन दिवसांतून आले आहेत. रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ३७ टक्क्यांवर गेलेले असताना शुक्रवारी हेच प्रमाण २३ तर शनिवारी २१ टक्के इतके खाली आले आहेग्बाधित रुग्ण ६०७ आढळले असले तरी बरे झालेल्या रुग्णांची संख्या ८१९ इतकी झाली.
उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वात चिंताजनक बाब ही पॉझिटिव्हीटी रेटची होती. मागील काही दिवसांत झालेल्या चाचण्यांतून प्रत्येकी ५ व्यक्तींमागे २ व्यक्ती या कोरोना बाधित आढळून येत होत्या. त्यामुळे कोरोनाचे संक्रमण हे मोठ्या प्रमाणात झाल्याचे स्पष्ट झाले होते. दरम्यान, आता गेल्या दोन दिवसांपासून हे प्रमाण खाली घसरण्यास सुरुवात झाली आहे. या दोन दिवसांतील आकडेवारी लक्षात घेतल्यास ही घसरण स्पष्ट होते. शुक्रवारी १ हजार ९४३ चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातून ४५८ रुग्ण आढळले. पॉझिटिव्हीटी रेट हा २३ टक्के इतका राहिला. म्हणजेच जवळपास ४ व्यक्तींमागे १ बाधित असे हे प्रमाण होते. दरम्यान, शनिवारी चाचण्या मोठ्या प्रमाणात झाल्या. रॅपिड व आरटीपीसीआर अशा दोन्ही मिळून २ हजार ८८० चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. यातून ६०७ रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्हीटी रेट हा २१ टक्के इतका राहिला. अर्थात प्रति पाच व्यक्तींमागे १ जण बाधित निघाला. काही दिवसांपूर्वीपर्यंत हेच प्रमाण प्रति ५ व्यक्तींमागे २ असे होते. म्हणजेच बाधित आढळून येण्याचे प्रमाण हे शनिवारी जवळजवळ निम्मेच झाले आहे. अशीच घसरण पुढचे काही दिवस राहिल्यास लाट ओसरण्यास सुरुवात झाली, असे म्हणता येऊ शकेल.
मृत्यू थोपविण्याचे आव्हान कायम...
शनिवारी १२ कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. शुक्रवारीही १५ मृत्यूची नोंद झालेली होती. आतापर्यंत आढळलेल्या एकूण ४८ हजार ४६४ बाधितांपैकी १ हजार १०५ जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांचा होत असलेला मृत्यू थोपविण्याचे आरोग्य यंत्रणेसमोरील आव्हान मात्र कायम आहे.
ॲक्टीव्ह रुग्णांची संख्याही कमी...
गेल्या काही दिवसांपासून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. १ मे रोजी जिल्ह्यात ७ हजार ११८ रुग्ण उपचार घेत होते. १५ दिवसानंतर हीच संख्या १ हजार २३२ ने कमी होऊन ५ हजार ८८६ वर आली आहे. ही आकडेवारीही या परिस्थितीत शुभसंकेत देणारी ठरावी.