उस्मानाबाद -अंगणवाडीसाठीच्या गॅस कनेक्शनचे बिल काढण्यासाठी ४० हजारांची लाच स्वीकारताना परंडा बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई १८ जुलै राेजी परंडा येथे करण्यात आली. या प्रकरणी परंडा पाेलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नाेंदविण्याची प्रक्रिया सुरू हाेती.
परंडा तालुक्यातील ८६ अंगणवाड्यांना सरकारच्या याेजनेतून गॅस कनेक्शन पुरविण्याचे काम तक्रारदार एजन्सीला देण्यात आले हाेते. या एजन्सीचे प्रति गॅस कनेक्शन ६ हजार ५६३ रुपये याप्रमाणे ५ लाख ६४ हजार ४६१ रुपये एवढे बिल झाले हाेते. दरम्यान, निधी उपलब्ध झाल्यानंतर हे बिल काढण्यासाठी परंडा बालविकास प्रकल्प अधिकारी नारायण दशरथ गायके (वय ३२) यांनी संबंधित तक्रारदाराकडे प्रतिकनेक्शन ५६३ रुपये ५० पैसे याप्रमाणे ८६ कनेक्शनच्या ४८ हजार ६४१ रुपयांची संबंधित एजन्सीकडे मागणी केली. तडजाेडीअंती ४० हजार रुपये देण्याचे ठरले. परंतु, तक्रारदारास ही रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. संबंधित तक्रारीची पडताळणी केली असता, खात्री पटल्यानंतर रविवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने परंडा येथे सापळा लावला. यावेळी तक्रारदाराकडून सुमारे ४० हजार रुपये स्वीकारताना परंडा बालविकास प्रकल्प अधिकारी गायके यांना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी परंडा पाेलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नाेंदविण्याची प्रक्रिया सुरू हाेती. ही कारवाई ‘लाचलुचपत’चे पाेलीस निरीक्षक गाैरीशंकर पाबळे यांनी केली. त्यांना पाेलीस अंमलदार मधुकर जाधव, विष्णू बेळे, विशाल डाेके यांनी मदत केली.