येथील नगरपालिकेच्या नगराध्यक्षांच्या मनमानी कारभाराची चौकशी करून शहरातील नागरिकांना सुविधा मिळवून द्याव्यात अशी मागणी विधान परिषद आमदार सुरेश धस यांनी जिल्हाधिकारी यांना लेखी स्वरुपात केल्याने चर्चेला उधाण आले आहे.
आमदार सुरेश धस यांनी ४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांना पत्र देऊन त्यात त्यांनी म्हटले आहे की, नळदुर्ग नगरपालिकेच्या नगराध्यक्षा रेखा जगदाळे यांचा कारभार लोकशाही विरोधी आहे. नळदुर्ग शहरातील साफसफाई कामाची निविदा डिसेंबर २०२० मध्ये संपली आहे.या कामाची निविदा प्रक्रिया राबवावी अशी मागणी पालिका सदस्य करीत असताना त्याकडे नगराध्यक्षा अक्षम्य दुर्लक्ष करून स्वतःच्या अधिकाराचा दुरुपयोग करून परस्पर कामाचे वाटप करीत आहेत.
हुतात्मा निलय्या स्वामी उद्यानाचे काम झालेले नसतानाही ठेकेदाराला जादा रक्कम दिली. हे काम एक वर्षापासून रखडले आहे. तशीच अवस्था शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेच्या फिल्टर टाकी, पंप हाऊसच्या ठिकाणची असून त्या ठिकाणी आवश्यक ती कामे पूर्ण केलेली नाहीत. निविदेतील नमूद क्षमतेपेक्षा कमी क्षमतेचे वीज पंप बसवून देयके देण्यात आलेली आहेत. यासाेबतच अन्य बाबीही त्यात नमूद केल्या आहेत. या मुद्यांची सखाेल चाैकशी करून कारवाई करावी, अशी मागणी आ. धस यांनी केली आहे. त्यामुळे आता जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.