उमरगा -‘माझा वाॅर्डात संपर्क दांडगा आहे. त्यामुळे मी एकटा निवडून येण्यात काहीच अडथळा नाही’, असा ठाम विश्वास व्यक्त करीत अनेकजण स्वतच्या नावापुढे भावी नगरसेवक हे बिरूद लावण्यात यशस्वी झाले हाेते. परंतु, राज्य शासनाने अचानक वाॅर्ड रचना बदलली. तसा आदेशही काढला अन् भावी नगरसेवकांची काेंडी झाली. आता त्यांना निवडणुकीच्या पिच वरील डावपेच बदलावे लागणार आहेत. तर काहींनी ‘दाेन वाॅर्डातून मतदान घेणे माझ्यासाठी शक्य नाही’, असे म्हणत बाजूला हाेऊ लागले आहेत.
उमरगा शहरात पालिका निवडणूक अनुषंगाने गेल्या काही महिन्यांपासून सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू होती विशेषतः शिवसेनेने प्रत्येक वाॅर्ड निहाय निवडणूक लढवण्याच्या अनुषंगाने तयारी केली होती. वाॅर्डा-वाॅर्डात इच्छुक व कार्यकर्ते कामाला लागले होते. तर काँग्रेसच्या वतीनेही तयारी करण्यात आली आहे. प्रत्येक पक्षाचे अनेक इच्छुक आपापल्या वाॅर्डात वा दुसऱ्या वाॅर्डात निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सक्रिय झाले आहेत. असे असतानाच राज्य मंत्रिमंडळाने प्रभागनिहाय निवडणूक घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेला एक उमेदवार एका वाॅर्डातील मतदारांवर निवडणूक जिंकू शकत नाही. प्रभागातील सर्वच वाॅर्डातून मतदान घ्यावे लागणार आहे. अनेकवेळा काही प्रभागात दाेन अथवा तीन पैकी एखादा उमेदवार जरी त्यांच्या ठाेकताळ्यात बसला नाही तरी इतरांनाही मतदान करीत नाहीत. त्यामुळे सर्वच पक्षांना जनतेच्या मनातील आणि निष्कलंक उमेदवार द्यावे लागणार आहेत. एवढेच नाही तर त्यांना राजकीय डावपेच ही बदलावे लागतील. दरम्यान, एकीकडे पक्षाची ही अवस्था असताना दुसरीकडे अनेकजण ‘स्वबळ’ अजमविण्याच्या तयारीत हाेते. काेणी तिकीट नाही दिले तरी आपण सहज निवडून ये, असा ठाम विश्वास व्यक्त करीत. अशा मंडळीला ही सरकारच्या या निर्णयाने माेठा धक्का बसला आहे.
चाैकट...
भाजपाने उचलला हाेता फायदा...
मागील निवडणुकीत प्रभाग रचनेचा सर्वात जास्त फायदा भाजपला झाला होता. तब्बल सात नगरसेवक निवडून आले होते. त्याला शिवसेनेवरील जनतेची नाराजीची किनार होती. परंतु, यावेळी तशी परिस्थिती नाही. मागील निवडणुकीत शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या प्रभाग एक मधील तीनही जागा भाजपने जिंकल्या होत्या.
प्रभाग दोनमध्ये दोन व तीन मध्ये काँग्रेसने तब्बल तीन अशा पाच जागा पटकाविल्या होत्या. प्रभाग तीन हा शिवसेनेचा गड समजला जातो. मात्र, शिवसेनेवर जनतेची नाराजी हाेती. परंतु, मागील दाेन-अडीच वर्षात सेनेकडून या भागात सक्रियता ठेवली आहे. प्रभाग एक, तीन, सहा, नऊ व दहामध्ये सेनेचे बळ अधिक आहे. त्यामुळे त्यांनीही याच पट्ट्यात अधिक लक्ष दिले आहे.
चार, पाच, सहा या प्रभागातून जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी भाजपाचे प्रयत्न राहतील. काॅंग्रेस कडून दाेन, तीन, सात, आठ आणि नऊ या प्रभागात जाेर लावू शकते. राष्ट्रवादीची शक्ती मर्यादित असल्याने नेमके किती उमेदवार रिंगणात उतरवितात, हे रणधुमाळी सुरू झाल्यानंतरच स्पष्ट हाेईल.