वरिष्ठांसह लाेकप्रतिनिधींची डाेळेझाक-ग्रामीण भागातून आलेले लाेक ताटकळले
वाशी : येथील पंचायत समिती कार्यालयात कर्मचाऱ्यांवर काेणाचाच अंकुश उरला नाही की काय, असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. त्याला कारणही तसेच आहे. २३ सप्टेंबर राेजी सकाळी सव्वादहा वाजल्यानंतरही जवळपास ५० टक्के खुर्च्या रिकाम्याच हाेत्या. कर्मचाऱ्यांच्या या लेटलतीफपणामुळे ग्रामीण भागातून कामानिमित्त आलेले लाेक मात्र, पंचायत समितीच्या आवारातच ताटकळत थांबले हाेते.
राज्य सरकारने कर्मचाऱ्यांची सततची मागणी विचारात घेऊन पाच दिवसांचा आठवडा आणि मुख्यालयी वास्तव्य करणे सक्तीचे केले आहे. त्यामुळे उर्वरित पाच दिवस कार्यालय सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ या वेळेत चालते. असे असतानाही वाशी पंचायत समितीतील अनेक अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी वास्तव्य करीत नाहीत. बहुतांश जण जिल्ह्याच्या ठिकाणावरून ये-जा करतात. मात्र, दुसरीकडे घरभाडे भत्ता उचलला जाताे. याला ना वरिष्ठ अधिकारी कात्री लावण्याचे धाडस दाखवितात ना संबंधित कार्यालयीन प्रमुख. त्यामुळे लेटलतीफपणाची सवय अंगवळणी पडलेल्या कर्मचाऱ्यांचे मनाेबल उंचावत आहे. त्याचाच प्रत्यय गुरुवारी सकाळी आला. सव्वादहा वाजून गेल्यानंतरही कार्यालयातील जवळपास ५० टक्के खुर्च्या रिकाम्या हाेत्या. सकाळी तातडीने कार्यालयात जाऊन काम आटाेपले जावे, म्हणून अनेक ग्रामस्थ कार्यालय उघडण्यापूर्वी आवारात उपस्थित हाेते. मात्र, त्यांना रिकाम्या खुर्च्यांचे दर्शन घ्यावे लागले. काही बहाद्दर तर सकाळी ११ वाजले तरी कार्यालयात आले नव्हते. याबाबत कार्यालयीन अधीक्षक शिंदे यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी हजेरी पट मागवून घेतला. यानंतर जे कर्मचारी कार्यालयात नव्हते, त्यांच्या नावासमाेर गैरहजर असल्याचा शेरा टाकला. दरम्यान, संबंधित कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नाेटीस देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
चाैकट...
कार्यालयीन वेळ सकाळी ९.४५ वाजता सुरू हाेते. त्यामुळे या वेळेपूर्वी सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहणे अपेक्षित आहे. जे कर्मचारी उशिरा आलेले असतील, त्यांना नाेटिसा देण्यात येणार आहेत. खुलासा येताच याेग्य ती कारवाई केली जाईल.
-नामदेवराव राजगुरू, गटविकास अधिकारी