उस्मानाबाद : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र शासनाकडून तत्काळ मदत मिळावी, अशी मागणी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शून्य प्रहाराच्या माध्यमातून चर्चेत भाग घेऊन केली.
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील उस्मानाबाद जिल्ह्यासह, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, लातूर जिल्ह्यातील औसा व निलंगा तालुक्यात ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी झाल्याने उस्मानाबाद जिल्ह्यात ४ लाख १६ हजार शेतकऱ्यांचे २ लाख ६२ हजार हेक्टर, बार्शी तालुक्यात ७५ हजार ७८१ शेतकऱ्यांचे ६८ हजार ७६८ हेक्टर क्षेत्र तर लातूर जिल्ह्यातील औसा, निलंगा तालुक्यातील १ लाख ५२ हजार ४१७ शेतकऱ्यांचे ९५ हजार ७७७ हेक्टर शेती क्षेत्राचे एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यानंतर राज्य शासनाने या शेतकऱ्यांना भरपाईपोटी ४५८ कोटी ६८ लाख एवढी भरीव मदत दिली. परंतु केंद्र सरकारकडून मदत मिळाली नाही. तरी शेतकऱ्यांना केंद्र सरकारने एनडीआरएफमधून तत्काळ मदत करावी. तसेच शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडे एनडीआरएफमधून राज्य शासनाच्या ३ हजार ४२१ कोटी रु.चा प्रस्ताव मंजूर करून निधी राज्य शासनाला देण्यात यावा, अशी मागणी खा. राजेनिंबाळकर यांनी केली.