उमरगा : कोणत्याही कारणाने सभासदांचा मृत्यू झाला तर त्याचे संपूर्ण कर्ज माफ करण्याची घोषणा जिल्हा परिषद हायस्कूल टीचर्स सोसायटीचे चेअरमन पद्माकर मोरे यांनी केली. या सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.
यावेळी संस्थापक संचालक नियाज अली शेख, शिक्षक नेते काकासाहेब साळुंके, राज्य पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक कमलाकर मोटे, व्हाईस चेअरमन लक्ष्मण चव्हाण, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष बालाजी मसलगे उपस्थित होते. मोरे म्हणाले की, संस्थेस राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला असून, साडेबारा कोटींपेक्षा जास्त भाग भांडवल, दिवसाला व्याज आकारणी करणारी महाराष्ट्रातील एकमेव पतसंस्था असलेल्या या संस्थेचे कर्ज वाटप अकरा टक्के दराने तर ठेवीवरील व्याज आठ टक्के दराने देण्यात येत आहे. सभासदाच्या मुलीच्या लग्नासाठी कन्यादान ही नवीन योजना यावर्षी पासून लागू करण्यात आली आहे.
यावेळी संस्थेचे सेवानिवृत्त सभासद शंकर मुळे, चंद्रकांत आळंगे, गंगाबाई रजपूत, फुलचंद घंटे यांचा सत्कार करण्यात आला. ऑनलाइन सभेचे नियोजन तंत्रस्नेही शिक्षक संजय रूपाजी व अर्जुन भुसार यांनी केले. सभेसाठी संचालक दिनकर कुलकर्णी, हनुमंत शिंदे, श्रीमंत जाधव, महेश कांबळे, मीना सोनकांबळे, धनश्री दळवी, सचिव तुकाराम कुंभार, राम साळुंके, नवाज शेख यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व अहवाल वाचन संचालक बशीर शेख, प्रास्ताविक पद्माकर मोरे यांनी केले. आभार हनुमंत शिंदे यांनी मानले.