कळंब : शुक्रवारी बुकिंग, शनिवारी रवाना, रविवारी पोहोच, सोमवार ते शनिवार ‘ऑन ड्युटी’, रविवार वापसी, सोमवारी कोरोना ‘टेस्ट’ असा संपूर्ण आठवडाच धास्तीत जात असल्याने, कळंब आगारातील वाहक, चालकांना बेस्टची ‘मुंबई वारी’ नकोशी झाली आहे. यामुळे हैराण झालेल्या कर्मचाऱ्यांनी आपली कैफियत आगार प्रमुखांकडे मांडत ‘बेस्ट ड्युटी’ बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात, एसटी महामंडळाने कोरोना काळात मुंबई येथील ‘बेस्ट’ या परिवहन सेवेस मदतीसाठी हात पुढे केले आहेत. कोरोना काळात एसटीची ‘लालपरी’ जशी ठप्प होती, तशीच मुबंईतील ‘बेस्ट’ वाहतूक सेवाही ठप्प झाली होती.
दरम्यान, लॉकडाऊन ते अनलॉकच्या काळात उभयतांची गाडी रुळावर येत असताना बेस्टला मनुष्यबळाची गरज भासली. यावेळी नोव्हेंबर महिन्यात एसटीने मुंबई येथे सेवा करण्यासाठी बेस्टला आपले वाहक आणि चालक देण्यास सुरुवात केली. मागच्या पाच महिन्यांपासून यानुसार कळंब आगारातील कर्मचारी मोठ्या कठीण काळात ही सेवा बजावत आहेत.
यानुसार, साधारणतः प्रत्येकी दहा चालक व वाहकांना पाठविण्यात येत आहे.
शुक्रवारी त्यांच्या ड्युटीचे बुकिंग करण्यात येते. यानंतर, शनिवारी ते आगाराच्या बसने मुंबईच्या दिशेने रवाना होतात. रविवारी पोहोचतात अन् सोमवार ते शनिवार मुंबापुरीच्या रस्त्यावर बेस्टची गाडी घेऊन धावतात.
कोरोनाच्या धास्तीत आजवर कळंब आगाराच्या वाहक, चालकांनी ही सेवा बजावली आहे, परंतु कोरोनाचा परत एकदा मुंबईमध्ये प्रादुर्भाव वाढत असल्याने आता तरी ही सेवा बंद करावी, अशी मागणी कर्मचारी करत आहेत.
या संदर्भात कर्मचाऱ्यांना बेस्ट ड्युटीस पाठवू नये, अशी मागणी कळंब आगारातील इंटक संघटना, कामगार संघटना, कास्ट्राइब संघटना, कामगार सेना या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आगार व्यवस्थापक यांच्यामार्फत विभागीय नियंत्रक यांच्याकडे केली आहे.